Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा कार्यभार सनदी अधिकारी दीपक कपूर यांनी स्वीकारला

माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा कार्यभार सनदी अधिकारी दीपक कपूर यांनी स्वीकारला
, बुधवार, 22 डिसेंबर 2021 (21:26 IST)
मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच विविध समाजमाध्यमे देखील महत्त्वाची आहेत. माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी येत्या काळात समाजमाध्यमांचा अधिकाधिक वापर करुन शासनाच्या प्रतिमा निर्मितीचे काम करीत अचूकता आणि गतिमानतेवर भर द्यावा, असे आवाहन नवनियुक्त माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव दीपक कपूर यांनी केले.
 
श्री. दीपक कपूर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आज माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून स्वीकारला. यावेळी संचालक (प्रशासन) श्री. गणेश रामदासी यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. कपूर यांचे स्वागत केले तर डॉ. पांढरपट्टे यांना निरोप देण्यात आला. यावेळी प्रभारी संचालक (वृत्त-जनसंपर्क) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रदर्शने) श्रीमती सीमा रनाळकर, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर यांचेसह विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित बैठकीत श्री. दीपक कपूर म्हणाले की, समाजमाध्यमांमध्ये  मोठी ताकद असून विविध जागतिक, राष्ट्रीय घडामोडींमध्ये याचा वापर कसा होतो ते दिसून आले आहे.  शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काचे काम करीत असताना सर्व अधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांचा सकारात्मक वापर करण्याची गरज आहे. समाजमाध्यमांवरील शासनविषयक किंवा आपल्या विभागाशी संबंधित पोस्ट्सवर तत्काळ प्रतिसाद दिल्यास शासनाच्या सकारात्मक प्रतिमानिर्मितीला त्याचा मोठा लाभ होणार आहे. लोकाभिमुख कल्याणकारी योजना, शासनाचे जनहिताचे निर्णय, घोषणा, उपक्रमांची माहिती तत्काळ लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन श्री. दीपक कपूर यांनी यावेळी केले.
 
शासनाच्या समाजमाध्यमांवरील मजकूर हा प्रसारमाध्यमांसाठी बातमीचा स्त्रोत व्हायला पाहिजे हे सांगताना अचूक, वस्तुनिष्ठ आणि अधिकृत माहिती देणे हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या बातम्यांचा मूळ गाभा आहे, त्यादृष्टीने कमी वेळेत अधिक गतीने माहितीचे प्रसारण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहनही श्री. दीपक कपूर यांनी यावेळी केले.
 
यावेळी बोलताना मावळते सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दोन वर्षांच्या कालावधीतील कार्याचा आढावा घेतला. इतर सर्व विभागांपेक्षा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामाचा अनुभव आपणासाठी वेगळा होता, असे सांगताना त्यांनी अहोरात्र सजग राहून काम करणाऱ्या या विभागाने कोरोना काळात केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. डॉ. पांढरपट्टे यांची रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागात मृद व जलसंधारण सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
भारतीय प्रशासन सेवेच्या 1991 च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले श्री. दीपक कपूर हे सध्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे महासंचालक तथा सचिव (माहिती व जनसंपर्क) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
 कपूर यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, सोलापूरचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  या पदांवर काम केले आहे.
 
अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या विभागाचे सचिव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर श्री. दीपक कपूर यांनी उल्लेखनीय सेवा केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेनेच्या नेत्यांला लाज वाटली पाहिजे : देवेंद्र फडणवीस भडकले