Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छगन भुजबळ यांची यशस्वी शिष्टाई; भिडेवाडा परिसरातील व्यावसायिक उच्च न्यायालयातील याचिका मागे घेणार

chagan bhujbal
, गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (20:36 IST)
भिडे वाड्यात पुन्हा मुलींची शाळा होणे हेच सर्वात मोठे स्मारक असेल, अधिकाऱ्यांनी कामाला गती द्यावी - छगन भुजबळ
 
नागपूर, :- पुणे शहरातील भिडेवाडा या राष्ट्रीय स्मारकाचे पुढील दोन महिन्यात भूमिपूजन करण्याची तयारी करण्यात याव्यात अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनातील बैठकीत केल्या. तर वॉर फुटिंगवर काम करून मनपा आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी तातडीने नियोजन करून हे काम मार्गी लावावे असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या. त्यामुळे भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच निकाली निघणार आहे.
 
भिडे वाड्याच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे,माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, तसेच अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, अप्पर मुख्य सचिव नगरविकास, अप्पर मुख्य सचिव वित्त, प्रधान सचिव पर्यटन, प्रधान सचिव संस्कृतिक कार्य, मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे मनपा आयुक्त आणि गाळेधारक व्हिडिओ कॉन्फर्सिंग द्वारे उपस्थित होते.
 
या बैठकीत छगन भुजबळ यांनी राष्ट्रीय स्मारकाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री शिक्षणाची गंगोत्री अन् भारतातील पहिल्या महिला शिक्षिका. फुले दाम्पत्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठीची पहिली शाळा सुरु करून शिक्षणाची कवाडं उघडली. मात्र,काळ सरला आणि हीच प्रेरणादायी शाळा अक्षरशः भग्नावस्थेत गेली. जागेचं प्रकरण न्यायालयात गेलं आणि खटला वर्षानुवर्षे सुरु राहिला आता मात्र हा वाद आपल्याला मिटवला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
 
ते म्हणाले की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याने मुलींची पहिली शाळा दि. १ जाने १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात सुरु केली आणि स्त्री शिक्षणाचे बीज हिंदुस्थानात रोवले असणे, शुद्रातिशूद्र समाजासाठी ज्ञानाची कवाडे खुली करून शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून त्यानंतर मोठा संघर्ष करून अनेक महिला शाळा त्यांनी सुरू केल्या त्याच सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शाळेची आज दुरवस्था पहावत नाही असेही ते म्हणाले.
 
ते म्हणाले की,“पुणे येथील भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी काल दिवसभर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. बाबा आढाव यांच्यासह समता परिषदेचे अनेक कार्यकर्ते भिडेवाड्याच्या समोर उपोषणाला बसलेले होते. ही ऐतिहासिक वास्तू पुणे महानगरपालिकेने विहित पद्धतीने ताब्यात घेवून त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी मनपाने दि. २१ फेब्रुवारी २००६ रोजी ठराव क्र. ५५७ अन्वये ठराव मंजूर केलेला आहे. भिडेवाडयात पुणे महानगरपालिकेच्या वतीने "सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा”  सुरु करण्याचा दि. २७ नोव्हेंबर २०२१ रोजी शासनाने निर्णय घेतलेला आहे.  महानगरपालिकेने ही ऐतिहासिक वास्तू ताब्यात घेऊन या ठिकाणी “सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा” सुरु करून राष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
 
ते म्हणाले की, शासनाने या जागेवर उपलब्ध चटईक्षेत्र निर्देशांक विशेष बाब म्हणून नियम शिथिल करून वाढीव अथवा मेट्रोमर्गिका करीताचा चटईक्षेत्र निर्देशांक (FSI) अधिकचा मंजूर करून आताच्या सर्व भाडेकरूंचे पुनर्वसन नवीन इमारतीमध्ये तळ मजल्यांवर किंवा एक मजल्यावर करता येईल. अतिरिक्त चटई क्षेत्र वापरून उपलब्ध होणाऱ्या उर्वरित मजल्यांच्या बांधकामात "सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा” तसेच या दांपत्याचे आयुष्य व त्यांचे कार्य याविषयी माहितीपट कायमस्वरूपी प्रदर्शन, जीवनपट चित्रफीत आणि अभ्यासिका,सुसज्ज सभागृह असे सर्व प्रकल्प महानगरपालिकेने (जागा संपादनासाठी होणाऱ्या अनावश्यक खर्चाच्या बचतीतून व शासनाचे अतिरिक्त अनुदान) यातून करावे. यामुळे भाडेकरूंचे नुकसान न होता किमान खर्चात चांगले स्मारक होऊ शकेल अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी छगन भुजबळ यांची शिष्टाई काम आली असून गाळेधारक व्यासायीकानी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या स्मारकासाठी त्यांनी उच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या जागेची कायदेशीर अडचण दूर होणार आहे.
 
त्यानंतर यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांच्या आत भूमिपूजन करण्याची तयारी करण्यात यावी यासाठी आवश्यक ती सर्व तयारी अधिकाऱ्यांनी करावी अशा सूचना दिल्या. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वार फुटिंगवर काम करून गाळेधारकांसोबत तातडीने बैठक घेऊन मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी तातडीने अहवाल सादर करावा असे आदेश दिले.
 
 
महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकांच्या विस्ताराचा प्रश्न मार्गी
 
महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकाला जोडणाऱ्या रस्त्याचे भूसंपादन तातडीने करण्यात येऊन लवकरच महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित स्मारक होईल अशी माहिती मुख्यमत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी सांगितली
 
यावेळी छगन भुजबळ यांनी या स्मारकाच्या रखडलेल्या विस्ताराच्या कामाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, सन १९९२ साली पुणे शहारातील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राहते घर राष्ट्राला अर्पण करून सदर वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. सदर स्मारक व त्याच्या परिसराचे नूतनीकरण व जतन करण्यासाठी आवश्यक कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आलेले आहेत.
 
महात्मा फुले यांच्या राज्य संरक्षित स्मारकाशेजारी दिडशे मीटर अंतरावर पुणे महानगरपालिकेच्या मिळकतीमध्ये महानगरपालिकेमार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम करण्यात आलेले आहे. या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्याचे नियोजित आहे. तेथे राहणाऱ्या रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करून रस्ता करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे फुले वाड्याच्या आजूबाजूला राहत असलेल्या काही नागरिकांच्या जागा संपादित करून या स्मारकाच्या विस्तारासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करण्याची मागणी आहे.
 
फुलेवाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक या दोन्ही स्मारकांचे जतन व विकसन होण्याच्या दृष्टीने दोन्ही स्मारकांच्या सभोवतालच्या भागाचे भूसंपादन आणि विकसन होण्यासाठी नगरविकास विभागाने दि. २५ नोव्हेंबर, २०२१ च्या शासन राजपत्राअन्वये प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१कक) नुसार हा निवासी झोन स्मारकासाठी आरक्षित केला आहे. या स्मारकांना वर्षभर राष्ट्रीय नेते व अतिमहत्वाच्या व्यक्ती भेटी देण्यासाठी येत असतात. मात्र येथे वाहतुक व वाहनतळासाठी प्रशस्त जागा नसल्याने व नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी, भूसंपादन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि पुणे मनपाने या दोन्ही स्मारकांचा विस्तार आणि या वास्तूंसाठी जोड रस्ता विकसन प्रकरणी भूसंपादनाची कार्यवाही लवकरात लवकर करण्याची गरज आहे अशी मागणी त्यांनी केली.
 
या बैठकीत माहिती देताना पुणे शहराचे आयुक्त म्हणाले की,  विभागाने आरक्षणात बदल केले आहे. याठिकाणी ३६ झोपडपट्टी धारक होते. त्यांचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. त्यामुळे तातडीने याठिकाणी भूसंपादन करण्यात येऊन लवकरच महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित स्मारक होईल.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुक्ता टिळक यांचं निधन, नगरसेविका ते आमदार...