छत्रपती संभाजी नगर येथे 160 किलो वजनाच्या महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली असून तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. एवढ्या वजनी महिलेची प्रसूती करण्याची ही दुसरी घटना आहे. या पूर्वी एका 162 किलो वजनाच्या महिलेची प्रसूती करण्यात आली होती. आता छत्रपती संभाजी नगरच्या एका खासगी रुग्णालयात महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून दोघींची प्रकृती उत्तम आहे.
वजनी महिलांची प्रसूती मध्ये खूप गुंतागुंती असते. डॉक्टरांना प्रसूती पर्यंत अशा महिलांची विशेष काळजी घ्यावी लागते. छत्रपती संभाजी नगर येथे बाबा पेट्रोल पंपाजवळ एका खासगी रुग्णालयात 160 किलोचे वजन असलेल्या महिलेची यशस्वी प्रसूती झाली आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
या महिलेचे वय 30 वर्ष असून लग्नाच्या आठ वर्षांनंतर तिने मुलीला जन्म दिला. तिचे वजन जास्त असल्यामुळे सोनोग्राफीच्या चाचणीत बाळ व्यवस्थित दिसत नव्हते. अशा परिस्थितीत तिला डॉक्टरांनी गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ती फार निराश झाली. मात्र या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिची यशस्वी प्रसूती केली आणि तिच्या मुलीला या जगात सुखरूप आणले. बाळ आणि तिच्या आईची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.