Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विश्वास आणि विकासामुळे भाजपाला विजय: फडणवीस

विश्वास आणि विकासामुळे भाजपाला विजय: फडणवीस
मुंबई- विश्वास व विकासाच्या मुद्द्यावर जनतेने भारतीय जनता पार्टीला महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत भरघोस यश दिले आहे. या संस्थांमध्ये कारभार करताना पारदर्शिता व प्रामाणिकपणाबाबत कसलीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या पिंपरी – चिंचवड येथील बैठकीच्या समारोप सत्रात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.
 
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांमुळे देशात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. राज्य सरकारने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामांमुळे राज्यातील जनतेचा विश्वास बळकट झाला. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीतील भाजपाचा विजय हा या विश्वास व विकासाचा विजय आहे हे भान हवे. या विजयातून अहंकार निर्माण होता कामा नये. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ते प्रधान सेवक आहेत. त्याच सेवेच्या भावनेने जनतेसाठी काम करायचे आहे. त्यांनी सांगितले की, विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांचा आणि जनतेचा प्रतिसाद नाही. सत्तेवर असताना ज्यांनी शेतकऱ्यांची अवस्था वाईट केली, तेच आता संघर्ष यात्रा काढत आहेत. शेतकऱ्यांची भाजपाकडून अपेक्षा आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद करण्यासाठी यात्रा काढावी आणि भाजपाचे सरकार शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या कामाची माहिती त्यांना द्यावी.
 
प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले की, राज्यातील राजकीय स्थिती पूर्ण बदलली आहे. केंद्रातील सत्ता आणि राज्यातील सत्तेपाठोपाठ भाजपाने महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. आता सर्वांनी पक्षसंघटनेच्या कामांवर भर द्यायचा आहे. 
 
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पक्षाच्या विस्तारक योजनेत प्रत्येक मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकाऱ्याने गावोगाव जाऊन पक्षाचा विचार आणि सरकारचे काम सांगायचे आहे.
 
ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पहिला लढा भाजपानेच सुरू केला. भाजपा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या विरोधात नाही. शेतीमध्ये गुंतवणूक वाढवून शेतकऱ्याला सबळ केल्याशिवाय कर्जमाफीचा उपयोग होत नाही. त्यामुळे शेतीमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी व शेतकऱ्याला साधने देण्यासाठी भाजपा सरकारने अनेक पावले टाकली आहेत. शेतकऱ्यांसाठी भाजपा सरकारने अनेक कामे केली आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती जनतेपर्यंत पोहचवावी. दिवंगत भाजपा खासदार व अभिनेते विनोद खन्ना यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपाच्या वाटेवर नाही: गुरुदास कामत