उद्धव ठाकरे सरकारला पाठिंबा देणारे आणि आता शिंदे गटात सहभागी असलेले आमदार बच्चू कडू यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. तसेच, नव्या सरकारमध्ये असलेल्या मंत्रीपदाच्या अपेक्षेविषयीही बच्चू कडूंनी भूमिका स्पष्ट केली आहे.
“समेटासाठी सूरतला गेलो होतो”
यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी आपण सूरतला शिंदे गटात सहभागी होण्यासाठी नसून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात समेट होऊ शकेल का? हे पाहाण्यासाठी गेलो होतो, असा खुलासा केला आहे. “मुंबईहून सुरतला जाण्याआधी मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता. पण त्यांचा फारसा समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. मग मला वाटलं की शिंदे आणि ठाकरेंमध्ये समन्वय साधता येईल का? त्यासाठी आम्ही सूरतला गेलो. पण तोपर्यंत तिथे आमदारांची संख्या २९-३० पर्यंत गेली होती. तेव्हा लक्षात आलं की तिथे कुणाची समेटाची मानसिकता नव्हती. सत्तास्थापनेनंतरच तिथून निघण्याची प्रत्येकाची भूमिका होती”, असं बच्चू कडू म्हणाले.