Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारला उपहासात्मक टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा  केंद्र सरकारला उपहासात्मक टोला
, गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (17:01 IST)
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोल, डिझेलचे दरवाढ आपल्या भल्यासाठीच होत आहे, असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला.
 
एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास अहवालाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला चिमटे काढले. सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का घसरतोय हे केंद्राच्याही लक्षात आलं आहे. म्हणूनच त्यांनी इंधनाचे दर वाढवायला सुरुवात केली आहे. आपण टीका करतो की पेट्रोल एवढं वाढलं, डिझेलचे भाव तेवढे झाले. तसं नाहीये. हे आपल्या भल्यासाठीच होतंय, असा चिमटा काढतानाच मी काही बोललो तर टीकात्मक किंवा उपहासात्मक बोलतो असं म्हणता. पण मी खरं की खोटं बोलतो हे तुम्ही सांगा. इंधन परवडेनासं झालं तर तुम्ही म्हणतात तसं प्रवासी तुमच्या बाजूने येतील की नाही? म्हणून चांगल्या हेतूने सरकार इंधन दरवाढ होत आहे. पण आपण लक्षातच घेत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
 
 एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन यांच्याशी बोलणं झालं. त्यांना मी म्हटलं, वाहतूक व्यवस्थेचा तुम्ही अभ्यास केला ना. त्यावर ते म्हणाले, हो केला. खरं तर अभ्यास करण्याचं काम आमचं असतं तर आम्ही राजकारणात आलोच नसतो. मार्क देण्याचं काम आमच्याकडे आलं आहे. साहजिकच आहे शासन, प्रशासन आपल्या सर्वांची जबाबदारी एक असते. अशावेळी राजकारण एका बाजूला ठेवायचे असते. जनतेला सोयी सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे. ते पार पाडताना त्यात राजकारण येऊ नये. येऊ देणारही नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्रांती रेडकरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, योग्य तो न्याय मिळावा अशी केली मागणी