जळगाव : खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी जळगाव येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात येईल. तसेच केळी विकास महामंडळासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद करण्यात येईल. त्याचबरोबर बोदवड उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगावात केल्या.
जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदान येथे शासन आपल्या दारी या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, शासन आपल्या दारी अभियानात जळगाव जिल्ह्यात ३ लाख ३ हजारपेक्षा अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला आहे.
यापैकी ३५ हजार लाभार्थी उपस्थित आहेत. सततच्या पावसामुळे झालेले नुकसान नैसर्गिक आपत्ती म्हणून धरले. शेतकऱ्यांना १५०० कोटी रूपयांची नुकसान भरपाई दिली. नैसर्गिक आपत्तीसाठी आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना १२ हजार कोटींची मदत केली आहे. एक रूपयात पीक विमाचा निर्णय घेतला.
नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रूपये प्रोत्साहन रक्कम दिली. महिला सक्षमीकरणासाठी लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. शासकीय योजनांचा लाभ घेऊन सरपंचांनी आपले गाव स्वच्छ व समृद्ध करण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
Edited By - Ratnadeep ranshoor