हवामान बदलामुळे महाराष्ट्राला वाढत्या जोखमीचा सामना करावा लागतो आहे, ज्याचा परिणाम सोयाबीन, कापूस, गहू आणि हरभरा या चार प्रमुख पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील शेतीवर हवामान बदलाचा परिणाम या अहवालात राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश या विभागातील ८ जिल्ह्यांच्या पर्जन्यमान आणि तापमान यांच्या आकडेवारीचे आठवडानिहाय ३० वर्षांचे ऐतिहासिक (१९८९-२०१८) आणि पूर्वानुमान (२०२१-२०५०) परीक्षण केले आहे. इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल कॅम्युनिटीज (आय.एस.सी.) या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे.
आय.एस.सी.चे जल आणि कृषी कार्यक्रमाचे सहयोगी संचालक रोमित सेन म्हणाले, “या अहवालात सादर केलेल्या विश्लेषणामध्ये, क्लायमेट मॉडेलिंग आणि पूर्वानुमान (दोन्ही, ऐतिहासिक आणि भविष्यातील) व पीक फेनोलॉजी (प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर पिकासाठी इष्टतम परिस्थिती) यावर भाष्य केले आहे. या परीक्षणामध्ये समुदायावर आधारीत सहभाग-मूल्यांकनाचा (शेतक-यांकडून पडताळणी) समावेश आहे शिवाय प्रत्येक पिकावर आणि शेतकऱ्यावर हवामान बदलांचा संभाव्य परिणाम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हे मूल्यांकन साप्ताहिक आकडेवारीनुसार केले आहे. हवामान विश्लेषणानुसार पावसाळ्यात (खरीप हंगाम) आणि हिवाळ्यात (रब्बी हंगाम) पीक फेनोलॉजीसह पाऊस आणि तापमानाचे पॅटर्न न जुळण्याबाबतही अंदाज वर्तविला जातो.”
उशिरा सुरु होणारा पावसाळा आणि अधून मधून पडणारा दुष्काळ आणि पाऊस यामुळे सोयाबीन व कापूस यांच्या उगवण क्षमतेवर खूप परिणाम झाला आहे. तसेच खरीप हंगामाच्या मधोमध पडणारा मुसळधार पाऊस यामुळे बुरशीजन्य रोग, तण आणि कीटक यांची वाढ होण्याचा संभव वाढतो. याचा परिणाम सोयाबीनमधील शेंगा उत्पादनावर आणि कपाशीच्या बोड तयार होण्यावर होण्याची शक्यता आहे. पाण्याचा निचरा न होणारी जमीन आणि दमट परिस्थितीमुळे पिकांची मूळे सडण्यास उत्तेजन मिळेल,
तसेच मातीतील पोषकद्रव्ये आणि खतांची परिणामकारकता कमी होईल. सोयाबीन आणि कापूस या परीक्षण केलेल्या खरीप पिकांसाठी फळ तयार होण्याच्या आणि परीपक्वतेच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा एकूण परिणाम उत्पादन आणि गुणवत्तेवर असेल.
येणाऱ्या काही वर्षात गहू लागवडीसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे धान्य परिपकव होण्याच्या वेळी असणारे उच्च तापमान हे आहे. तापमानात वाढ झाल्याने दाण्यांचे वजन कमी होते आणि परीक्षणानुसार धान्य भरण्याच्या वेळीच तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. हरभरा लागवडीत शेंगा भरण्याच्या दरम्यान तापमानात अचानक वाढ दिसून येईल ज्याचा परिणाम म्हणजे शेंगा कमी भरून उत्पादनात घट होईल.