Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल : 'राज ठाकरेंचे माकडचाळे सुरू आहेत',स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले

uddhav and raj thackeray
, रविवार, 1 मे 2022 (15:27 IST)
"गाजराची पुंगी वाजली तर वाजली, म्हणत काहीजण मार्केटिंग करायला आले आहेत. असे भोंगेधारी आणि पुंगीधारी खूप बघितले आहेत. आधी मराठी आणि आता हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करत त्यांचे माकडचाळे सुरू आहेत, हे न समजायला देशातील जनता मूर्ख नाही," अशा तिखट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली.उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या सध्याच्या भूमिकेवर नाव न घेता सडेतोड शब्दांत टीका केली.
 
"नव्या हिंदुत्त्वाच्या खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणत्या कोणत्या मैदानात कोण-कोणते खेळ करतात, हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलं आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात नाटक-सिनेमा वगैरे सगळं बंद होतं. त्यामुळे फुकटात करमणूक करून मिळत असेल तर का नको?"
 
ते पुढे म्हणाले, "शिवसेना हा हिंदुत्त्ववादी पक्षच आहे. ते लपवण्याची गरजही नाही. शिवाय, मी हे विधानसभेतही सांगितलेलं आहे. पण तरीही तीन वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष इतक्या चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, याचं सर्वांना आश्चर्य वाटतं."
 
"राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजपची 'बी' टीम नव्हे तर 'ढ' टीम आहे," अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे."मुन्नाभाई चित्रपटात मुन्नाभाईला गांधीजी वाचून वाचून आपणच गांधींसारखे बोलू शकतो असा भ्रम होतो. तसेच हे राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत असे समजू लागले आहेत," असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं.

2017 साली भाजप-सेना-राष्ट्रवादी युती होणार होती का या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपली बाजू स्पष्ट केली.

त्यावेळी किमान शिवसेनेला तरी हे माहीत नव्हतं. तीन पक्षांची युती होईल, हे आम्हाला तरी सांगितलं गेलं नव्हतं. माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेना-भाजप युतीमध्येच झाली होती. ही युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झालेली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय कदापी आलेला नव्हता. 2017 ला या चर्चा होण्यामागचं कारण कदाचित महापालिकेच्या निवडणुका असू शकेल. खरं तर महापालिकेच्या निवडणुकांवेळी भाजप-शिवसेना युतीच मुळात तुटली होती. त्यामुळे तीन पक्षांच्या युतीचा प्रश्न येतोच कुठे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. शिवसेनेला हिंदुत्वाची ओळख सांगण्याची गरजच नाही. तुम्हाला सारखे का झेंडे बदलावे लागतात, भूमिका बदलाव्या लागतात. अस्तित्व असलं तर टिकवण्याची लढाई असते. पण आधी अस्तित्व दाखवण्याचीच यांना गरज आहे, असंही ते म्हणाले.
 
आता आपण कोरोनामधून बाहेर पडत आहोत. बेसावध राहिलं तर कोरोना पुन्हा आपल्यावर आक्रमण करू शकतो. त्यांच्याकडे तुम्ही हे विषय घेऊन गेलात, तर ते काय म्हणतील, याचा विचार करा, असं ठाकरे यांनी म्हटलं.
 
हनुमान चालिसेचं पठण करण्याची नौटंकी करणारे खूपजण आहेत. त्यांना योग्यरित्या हाताळणारेही आमच्याकडे खूप आहेत. सरकार पाडण्याचा आटापीटा करू नका, असंही त्यांनी म्हटलं.
 
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही नेत्याकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, राज ठाकरे संध्याकाळी औरंगाबादमध्ये भाषण करणार आहेत. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बोलतील का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Dope Test: भारतातील दोन नामवंत खेळाडू डोप टेस्टमध्ये नापास, तीन वर्षांची बंदी