कोव्हिड 19ची वाढती रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्रातली कॉलेजेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलंय.
यामध्ये अकृषी विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठे, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांचा समावेश आहे. पण ऑनलाईन माध्यमातून वर्ग आणि शिक्षण सुरू राहणार आहे.
ज्या महाविद्यालयांच्या परीक्षा होऊ घातल्या आहेत त्यांनी त्या ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात अशी सूचना राज्य सरकारने दिली आहे. यासोबत जे विद्यार्थी कोरोना बाधित आहेत किंवा वीज उपलब्ध नसल्याने ज्यांना परीक्षेला बसता येणार नाही असे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत याची काळजी महाविद्यालयांनी घ्यावी, असंही सांगण्यात आलेलं आहे.
गोंडवाना, जळगाव आणि नांदेड विद्यापीठात कनेक्टिव्हिटीची अडचण आहे. त्या ठिकाणी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने कशा घेता येतील यासंदर्भात सुद्धा निर्णय घेतले जातील तर इतर विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचं कबूल केलेलं असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय.
संबंधित महाविद्यालय आणि विद्यापीठांची वसतिगृह बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. पण जे विद्यार्थी परदेशातून संशोधनासाठी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावं यासाठी त्यांना वसतिगृहात राहता येईल.
शिक्षकांच्या 50 टक्के उपस्थितीमध्ये ऑनलाइन पद्धतीचे शिक्षण हे सुरू राहील
दहावी - बारावी वगळता मुंबईत शाळाही बंद
मुंबईत दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर सर्व शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केलेला आहे.
महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाठी बंद ठेऊन ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्याची सूचना बीएमसी शिक्षण विभागाने केली आहे.
मार्च 2020 मध्ये राज्यातील शाळा बंद केल्यानंतर थेट 15 डिसेंबर 2021 रोजी पहिलीपासूनच्या शाळा सुरू झाल्या. परंतु आता पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता पाहता खबरदारी म्हणून शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.