Publish Date: Mon, 14 Feb 2022 (13:56 IST)
Updated Date: Wed, 28 Sep 2022 (20:29 IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. कुडाळ नगराध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आज नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक आणि शिवसेना आमदार वैभव नाईक कुडाळ नगरपंचायत येथील इमारतीच्या जवळ आले. त्याचवेळी शिवसेना, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. त्यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे सांगितले जाते. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र, यामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजप असा संघर्ष पाहायला मिळाला.
कुडाळ नगरपंचायत शिवसेना-काँग्रेसकडे
सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सहजपणे सरशी होणार असे वाटत असतानाच, अवघ्या एका जागेने ही नगरपंचायत शिवसेना-काँग्रेसच्या ताब्यात गेली. कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत भाजपने आठ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेला सात आणि काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला. आज नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून, ती भाजप आणि काँग्रेस-शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.