शिवसेनेचे आमदार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याआधीही महाराष्ट्राचे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटले. शिवाय, त्यांनी सरकार अडीच वर्षे सुरळीत असल्याने सरकार पाडण्याचे षडयंत्र असल्याचेही म्हटले.
दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी विरोधीपक्ष भाजपावर निशाणा साधला. “महाराष्ट्रात सत्तांतराचा हा तिसरा प्रयत्न आहे. भाजपाने यापूर्वी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मविआ सरकार बनवण्यापूर्वी ही अशी बंडाळी झाली होती. आम्ही विधान परिषदेच्या कालच्या निकालानंतर नाराज नाही. अडीच वर्षे सरकार योग्य चालत असल्याने हे षडयंत्र आहे. राजकीय पेचातून मार्ग निघेल सरकार कोसळणार नाही असा मला विश्वास आहे. तसेच, एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे की नाही माहित नाही”, असे त्यांनी म्हटले