अपरात्री शेजाऱ्याचा दरवाजा ठोठावल्याबद्दल कॉन्स्टेबलवर गैरवर्तनाचा आरोप ठेवण्यात आला असून त्याला त्यासाठी दंडही ठोठावण्यात आला होता. हा दंड रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (१३ मार्च) नकार दिला आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि एमएम साठ्ये यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
घरात कर्ता पुरुष नाही, घरी केवळ त्याची पत्नी आणि सहा वर्षांची चिमुरडी या दोघीच आहेत, याची कल्पना असतानाही एखाद्या पोटदुखीच्या क्षुल्लक कारणामुळे लिंबू मागण्यासाठी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावणे, हे अत्यंत निंदनीय आहे. ही गैरवर्तणूकच असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने तक्रार दाखल केली होती. या अधिकाऱ्याने घटनेच्या वेळी मद्यपान केले होते. तसेच, त्याचा सहकारी आणि तक्रारदार महिलेचा पती पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या कामासाठी गेला असल्याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यानंतरही याचिकाकर्त्या अधिकाऱ्याने अशा पद्धतीने तिच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला दिलासा देण्यास नकार दिला.
Edited By - Ratnadeep Ranshoor