Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी यांच्या शिवरायांबाबतच्या वक्तव्यांवरून वाद

भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी यांच्या शिवरायांबाबतच्या वक्तव्यांवरून वाद
, रविवार, 20 नोव्हेंबर 2022 (12:26 IST)
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे कोश्यारींवर टीका होताना दिसत आहे.
 
कोश्यारी हे काल (19 नोव्हेंबर) औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात सहभागी झाले होते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना डीलिट ही पदवी देऊन गौरवण्यात आलं.
 
या दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
 
कोश्यारी नेमकं काय म्हणाले?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुणाचा आदर्श ठेवावा यासंदर्भात वक्तव्य केलं.
 
ते म्हणाले, "आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे, ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे."
 
"मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.
 
"शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. भीमराव आंबेडकरा यांच्यापासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील," असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

सुधांशू त्रिवेदी यांचंही वादग्रस्त वक्तव्य
एकीकडे काल भगतसिंह कोश्यारी यांनी वरील वक्तव्य केलं. त्याचवेळी भाजप प्रवक्ते यांनी टीव्ही वादविवाद कार्यक्रमादरम्यान केलेलं एक वक्तव्यही वादग्रस्त ठरलं.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा पत्र लिहून माफी मागितली होती. त्यावेळी अनेकजण राजकीय समस्यांतून बाहेर येण्यासाठी माफीनामा लिहित होते, असं त्रिवेदी म्हणाले आहेत.
 
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेल्या एका आठवड्यापासून महाराष्ट्रात आहे. यात्रा महाराष्ट्रात दाखल होताच आयोजित एका सभेत राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकर यांच्यावर टीका केली होती. सावरकर यांनी इंग्रजांना घाबरून माफी मागितली होती, असं त्यांनी म्हटलं होतं.
 
यावर राज्यातील सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे गटासह मनसेने याचा विरोध दर्शवला. हा वाद ताजा असताना याच संदर्भात आज तकच्या एका टीव्ही डिबेट कार्यक्रमात भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी सहभागी झाले होते.
 
"त्यावेळी प्रस्तावित फॉरमॅटमध्ये सावरकर यांनी माफी मागितली तर काय झालं, त्यांनी ब्रिटिश संविधानाची शपथ तरी नाही घेतली," असं ते म्हणाले.
 
याच दरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला 5 वेळा पत्र लिहिल्याचं वक्तव्य केलं.
 
संतप्त राजकीय प्रतिक्रिया
कोश्यारी यांच्यासोबतच त्रिवेदी यांच्या या वक्तव्यांवर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्राबाहेर काढा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. 
 
मनसे प्रवक्ता गजानन काळे यांनीही कोश्यारींना महाराष्ट्राबाहेर पाठवा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कोश्यारी यांच्या वरील वक्तव्याचा निषेध करत शिवसेना खासदार संजय राऊत आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा बदला घेण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला.
तसंच त्यांनी सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यावरही टीका केली.
 
शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असं म्हणणारा ठार वेडाच असू शकतो, असं आव्हाड म्हणाले.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
 
इतकी वर्ष महाराष्ट्रात काढूनही महाराष्ट्राचा विचार, संस्कृती, आस्था व परंपरा न कळणं यापेक्षा दुर्दैव नाही, असं सावंत म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलो यांनी केली.
 
अन्यथा त्यांना रस्त्यावरही फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याआधीही शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले होते.
 
'समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय?' अशा आशयाचं विधान कोश्यारींनी फेब्रुवारीत केलं होतं.
 
तसंच जुलै महिन्यात मुंबईविषयीची त्यांनी केलेल्या विधानाचीही बरीच चर्चा झाली.
 
“मुंबई-ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास इथे पैसेच राहणार नाहीत." असं वादग्रस्त विधान कोश्यारींनी कलं होतं.
 
तसंच, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे अनुक्रमे 13 आणि 10 वर्षांचे आहेत. त्या वयात मुलगा मुलगी काय विचार करतात, असं त्यांनी म्हटल्यानंतर त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.
 
Published By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gujarat Election 2022 : सोमनाथमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले – नरेंद्रचे सर्व रेकॉर्ड भूपेंद्रने मोडावे