राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबीयांच्यावतीने संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आलं असून बारामती येथे परंपरेनुसार दरवर्षी होणारा सामुहिक दिवाळी उत्सव तसेच पाडव्याचा स्नेहभेटीचा पारंपारिक कार्यक्रम कोरोनामुळे यावर्षी रद्द करावा लागत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
दरवर्षी दिवाळीला पवार कुटुंबीय बारामतीत येऊन बारामतीकरांसह एकत्रितपणे दिवाळी साजरा करतात. पाडव्याला राज्यभरातून लाखो सहकारी, हितचिंतक बारामतीत येऊन पवार कुटुंबीयांना भेटतात. दिवाळीच्या शुभेच्छा देतात. हा कार्यक्रम सर्वांचा आनंद, उत्साह वाढवणारा असतो. आस्था, आपुलकी, स्नेहपूर्ण वातावरणात होणाऱ्या या कार्यक्रमाची ओढ आपल्या सर्वांनाच असते. परंतु, कोरोना संकटकाळात नागरिकांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी अनेक दशकांची सामुहिक दिवाळीची परंपरा यंदा खंडीत करावी लागत आहे. त्यामुळे इच्छा असूनही यंदा भेटता येणार नाही, याचं दु:ख निश्चितच आहे. परंतु, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करायचे असल्याने, कोरोनाला लवकरात लवकर हरवण्याचा निर्धार असल्याने आपल्याला यावर्षी एकत्र येता, भेटता येणार नाही, हे समजून घेतले पाहिजे. कोरोनाला हरवण्यासाठी आणखी काही काळ संयम आणि नियम पाळावे लागतील. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण सर्वांनी आपापल्या घरी, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन सुरक्षितपणे साजरी करुया. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला सुरक्षित ठेवूया, असे आवाहन करीत समस्त पवार कुटुंबियांनी राज्यातील जनतेला संयुक्त निवेदनाद्वारे दिवाळीच्या, नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.