राज्यात ई-पास बंद केला तर कोरोनाचा प्रसार वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आणखी काही काळ तरी ई-पास सुरू ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे सध्या तरी ई-पास बंद करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही, असं राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. ते नागपुरात बोलत होते.
केंद्र सरकारने ई-पास बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला असला तरी राज्यात सध्या तरी ई- पासची अट रद्द करण्याची सरकारची भूमिका दिसत नाही. राज्यात कोरोना रुग्णवाढीमुळे काही काळ तरी ई- पास सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
एसटी बसमधून ई-पासविना प्रवासाची मुभा असताना खासगी वाहनांना मात्र हा पास बंधनकारक आहे. त्यामुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या सरकारने ई-पासच्या धोरणाबाबत फेरविचार सुरू केला होता. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.