Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोघा मुलांची हत्या करणार्‍या निर्दयी पित्याचा मृत्यु

Latest News in Marathi
नाशिकरोड , शनिवार, 15 एप्रिल 2017 (11:14 IST)
आपल्या दोन लहान मुलांचा गळा दाबून हत्या करुन पेटवून घेतलेल्या नराधम पित्याचाही काल बिटको रुग्णालयात मृत्यू झाला. या तिघांवर काल शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, बापाच्या हल्यातून वाचलेल्या मोठी मुलगी संजीवनीच्या जीवाचा धोका टळला आहे. संपत्तीसाठीच या बापाने स्वतःच्याच पोरांचा खून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
 
नाशिकरोडच्या जगताप मळ्यातील तरण तलावाशेजारी ऋणानुबंध बंगला आहे. त्यामध्ये गुरुवारी दुपारी हे हत्याकांड घडले. सुनील बेलदार (५०) या पित्याने पत्नी कपडे धुताना दुपारी लहान मुलगा देवराज, मुलगी वैष्णवी यांची गळा दाबून हत्या केली. नंतर सुनीलने मोठी मुलगी संजीवनीला विषारी औषध दिले. सुदैवाने ती वाचली. पत्नी अनितालाही संपवण्याचा त्याचा डाव असावा, असे पोलिसांचे मत आहे. अनिता वेळीच सावध होऊन बाहेर पळाल्याने तिचा व संजीवनीचा जीव वाचला.
 
दरम्यान या प्रकरणी उपनगर पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सुनिल बेलदार यास रुग्णालयात दाखल केले. या घटनेप्रकरणी पोलीसांनी सुनिल बेलदार याचे विरूद्ध गुन्हा दाखल केला. परंतु बेलदार याचेही निधन झाले. सुनील खासगी क्लास घेत असे. तीन वर्षापासून तो बंद असल्याने त्याची आर्थिक चणचण वाढली होती. त्याच्या पत्नीच्या तक्रारीनुसार सुनीलचे क्लासमधील एका मुलीशी प्रेमसंबंध होते.
 
त्याला वैतागून अनिता माहेरी येथे राहत होती. पैशासाठी तो पत्नी व आई-वडिलांना मारहाण करत होता. त्यामुळे अनिता दोन वर्षापासून माहेरी होती. तर सुनिलचे आई-वडिल तपोवनातील वृध्दाश्रमात रहात होते. सुनील राहत असलेला बंगला आईच्या नावे होता. तो विकून पैसे द्यावेत, अशी मागणी सुनील आई-वडिलांकडे करायचा. तथापी, सुनीलच्या वडिलांनी बंगला विकण्यास साफ नकार दिला होता. कुटुंबियांना संपवले तर घर आपल्या नावावर होईल, पैसे मिळतील, या हीन विचाराने सुनीलने कुटुंबाला संपविण्याचा डाव रचला होता, असा पोलिसांचा संशय आहे.
 
सुनील वैफल्यग्रस्त झाल्याने अनिताला त्याच्यासोबत नाशिकला पाठवू नका, असे त्याच्या वडिलांनी अनिताच्या पालकांना सांगितले होते. तथापी, सुनील १२ एप्रिलला अनिताच्या माहेरी जाऊन गोड बोलून तीला घेऊन आला. सूत्रांच्या माहितीनुसार चौदा वर्षाच्या संसारात सुनीलने याआधीही कुटुंबाला संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना फिरायच्या निमित्ताने समुद्रात ढकलण्याचा त्याचा डाव होता. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुनिलचे आज पहाटे साडेचारच्या सुमारास बिटको रुग्णालयात निधन झाले. मरण्याआधी तो मिडीयावाले बोलवा, बायबल, कुराण आणा अशी असंबद्ध बडबड करत होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहुल गांधी यांच्या हाती लवकरच काँग्रेसची सूत्रे