Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक! महिला तस्करीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर...

धक्कादायक! महिला तस्करीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर...
, मंगळवार, 25 जुलै 2017 (11:23 IST)
महिला तस्करीबाबत घडणाऱ्या गुन्ह्यांमुळे महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भाजपा सरकारच्या कारकीर्दीत राज्याच्या अधोगतीच्या प्रगतीपुस्तकावर पुन्हा एक लाल शेरा उमटला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत त्याचे प्रमाण कोलकातानंतर सर्वाधिक आहे. ही लाजिरवाणी आणि चिंताजनक गोष्ट आहे.
 
मार्च २०१७ मध्ये १९,२२३ महिला आणि मुले यांची तस्करी झाली. २०१५ मध्ये हे प्रमाण १५,४४८ होते. देशात सुमारे २७ लाख महिला या तस्करीमुळे देहव्यवसायात ढकलल्या गेल्या आहेत. त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही माहिती राज्य महिला आयोगानेच रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतच मान्य केली. दरम्यान महिलांवरील अत्याचारांची चौकशी व्हावी यासाठीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नागपूर जिल्हा महिला अध्यक्षा अल्का कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष दिनकर वानखेडे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना दिले. मात्र महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला समाधानकारक उत्तर दिले नाही. महिला आयोगाच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आयोगाच्या पत्रकार परिषदेतच ढोल वाजवून राष्ट्रवादीने आंदोलनही केले.
 
महिलांच्या तस्करीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असणे ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी चिंताजनक बाब आहे, असे मत राष्ट्रवादी महिला काँग्रसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केले. नोकरी, प्रेमसंबंध, विविध आमिषांसह बळजबरीने या महिलांना विदेशात पाठवले जाते व तिथे त्यांच्याकडून देहव्यवसायासह मजुरी व इतर कामे करवून घेतली जातात. विदेशातीलही महिलांना या कामाकरिता भारतात आणून त्यांच्यावर अन्याय केला जातो. अशामध्ये ज्या महिला आयोगाने या गोष्टींचा सरकार दरबारी पाठपुरावा करून या प्रकरणांचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा , महाराष्ट्र महिला तस्करीत दुसऱ्या क्रमांकावर आहे हे पत्रकार परिषद घेऊन सांगत आहेत हे राज्याचं दुर्दैव आहे. महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे हे तर आम्ही वेळोवेळी सांगत आलो त्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनही करत आहोत मात्र राज्याची ही परिस्थिती पाहता आम्हाला महिलांच्या हक्कांसाठी प्रत्येक तासाला आंदोलन करावं लागतं की काय असं वाटू लागलं आहे, अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकला रशियन हेलिकॉप्टर मात्र युद्धासाठी नाही