Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पत्नीचे मंगळसुत्र लांबवले व पतीला मारहाण केली

पत्नीचे मंगळसुत्र लांबवले व पतीला मारहाण केली
नाशिकरोड , रविवार, 16 एप्रिल 2017 (11:38 IST)
नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या पळसे गावाजवळ एका चारचाकी वाहनास थांबवून त्यात बसलेल्या पतीला मारहाण करून पत्नीच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून लांबवल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी नाशिकरोड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबतचे वृत्त असे की, उत्तम खंडेराव गायकवाड, रा. काठे गल्ली, द्वारका, नाशिक हे पत्नीसह कार नंबर एमएच ०२ बीजे ३८५९ मधून सिन्नरहून नाशिककडे येत होते. शिंदे पळसे गावाजवळ असलेल्या हॉटेल विसावा ते किरण ढाबा या दरम्यान त्यांची कार अशोक तायडे उर्फ वाकचौरे या व्यक्तीने थांबवली.
 
त्यानंतर गायकवाड यांच्याशी वाद घातला. ही घटना घडत असताना पत्नीने हस्तक्षेप केला असता तायडे याने गायकवाड यांना मारहाण करून जखमी केले व त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून पसार झाला. या घटनेनंतर गायकवाड यांनी नाशिकरोड पोलीसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास वपोनि पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
 
वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार
नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावाजवळ रस्ता ओलांडत असताना ७४ वर्षीय वृद्धाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर वृद्ध ठार झाला असून या प्रकरणी नाशिकरोड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मुरलीधर सावळीराम शिंदे हे शिंदे गाव येथे रस्ता ओलांडत असताना नाशिकहून सिन्नरकडे भरधाव वेगाने येणार्‍या चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे या अपघातात शिंदे जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. या प्रकरणी मोहन मुरलीधर शिंदे (चेहेडी) यांनी नाशिकरोड पोलीसांत अज्ञात वाहनचालकाविरूद्ध फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सपोनि शेवाळे हे करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तानची वाईट प्रतिमा नागरिकांमुळेच - मलाला