कडाक्याच्या थंडीमुळं संपूर्ण देशामध्ये सध्या हुडहुडी भरल्याचं चित्र आहे. राज्यातही सगळीकडे कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळत आहे.
मात्र, एकिकडं अशी थंडी असताना आता डिसेंबर महिन्यामध्येच राज्यात काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यतादेखील व्यक्त करण्यात आलेली आहे.
राज्यामध्ये 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर या दरम्यान विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना यासह जळगाव आणि विदर्भातील गोंदिया, भंडारा, वर्धा नागपूर, अकोला, अमरावती अशा ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या वायव्य आणि मध्यभारतात पश्चिमी चक्रावात आणि त्याच्या चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव जाणवत असल्यामुळे हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या भागात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.