मुंबई : दक्षिणेतील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरामधून उठणाऱ्या मेंडोस चक्रीवादळाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूत हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे तिन्ही राज्यांमध्ये मुसळधार पावसाबरोबरच वादळी वारे देखील वाहण्याची शक्यात हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे चेन्नईपासून 900 किमी आग्नेयेस जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर तिन्ही राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचा महाराष्ट्रावर देखील काही परिणाम होणार नसला तरी दमट वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तामिळनाडूच्या 13 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर शुक्रवारी (दि. 9) 12 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तमिळनाडू येथील तिरुवरूर आणि तंजावर जिल्ह्यामध्ये पावसाच्या इशाऱ्यामुळे आज शाळांना सुट्टी जाहीर देण्यात आली आहे.
हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. याचे हळूहळू चक्रीवादळामध्ये रूपांतर होत आहे. आज हे वादळ उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी, नैऋत्य बंगालचा उपसागर आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनार्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर ते तामिळनाडू, पुद्दुचेरी ओलांडून 10 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कसे असणार वातावरण
बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ सध्या आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर विशेष असा काही परिणाम होणार नाही. याबाबत हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे. चक्रीवादळाचा विशेष परिणाम हा महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यामध्ये आठवडाभर म्हणजे 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अवकाळी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात थंडीवर परिणाम होणार आहे. राज्यात सध्या असणारा थंडीचा जोर कमी होणार आहे. थंडीला कदाचित आठवडाभरच अटकाव होण्याची शक्यता आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor