Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

तौक्ते चक्रीवादळ : सिंधुदुर्ग-रत्नागिरीला तडाखा

Cyclone Taukte hits Sindhudurg-Ratnagiri
, सोमवार, 17 मे 2021 (20:36 IST)
तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना बसला आहे. तौक्तेमुळे रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत, तर सिंधुदुर्गात 100 हून अधिक घरांचं नुकसान झालंय.
 
तौक्ते चक्रीवादळ आता रायगड आणि मुंबईच्या दिशेनं वळलाय. किनारपट्टीपासून आत समुद्रात हे चक्रीवादळ असलं तरी किनारपट्टीच्या भागात वाऱ्यामुळे नुकसानीची शक्यता पाहता, प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळ घोंगावत आहे. आज (16 मे) सकाळी या चक्रीवादळानं आणखी रौद्ररूप धारण केलं. वेधशाळेनं या वादळानं 'व्हेरी सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म' म्हणजे अतितीव्र चक्रीवादळाची पातळी गाठली असल्याचं जाहीर केलं आहे.
 
मुंबईत लाईफगार्ड्स तैनात
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील तयारीबाबत काही वेळापूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांना माहिती दिली.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं की, "तौक्ते चक्रीवादळ गोव्याहून पुढे सरकून रत्नागिरीच्या जवळ आलं आहे. आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या चक्रीवादळामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. समुद्र किनाऱ्याजवळ लाईफगार्ड्स तैनात करण्यात आलेत."
महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून तौक्ते चक्रीवादळ साधारण दोनशे ते तीनशे किलोमीटरवर असेल, पण त्याच्या प्रभावामुळे किनारी प्रदेशात वेगवान वारे वाहण्याची आणि मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.
 
रायगड : समुद्रकिनाऱ्यावरील 5,924 नागरिकांचं स्थलांतर
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या आतापर्यंत 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतर पूर्ण झालं आहे.
 
अलिबाग-339, पेण-158, मुरुड-1067, पनवेल-168, उरण-451, कर्जत-0, खालापूर-176, माणगाव-490, रोहा- 72, सुधागड-165, तळा- 135, महाड-1080, पोलादपूर-86, म्हसळा- 397, श्रीवर्धन- 1158 अशी तालुकानिहाय स्थलांतर झालेल्यांची आकडेवारी आहे.
तसंच, रायगडच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात चक्रीवादळासंदर्भात उपाययोजनांसाठी 'वॉर रूम' कार्यान्वित करण्यात आली आहे.
 
रत्नागिरी : घरं, वाहनांवर झाडं पडली, पाऊस सुरूच
रत्नागिरी शहरामध्ये वाऱ्यासह जोरदार पाऊस अद्यापही सुरुच आहे. चक्रीवादळ आता हळुहळू गुहागरच्या देशेनं सरकणार आहे. राजापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरांवर, वाहनांवर झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
चक्रीवादळामुळे जिल्हा प्रशासनानं आज रत्नागिरी, राजापूर, गुहागर, दापोली आणि मंडणगड या पाच तालुक्यांमध्ये संचारबंदी लागू केली होती. राजापूर आणि रत्नागिरीमध्ये किती नुकसान झालं आहे याचे आकडे प्रशासनाकडे उपलब्ध झालेले नाहीयेत.
 
सिंधुदुर्ग : 137 घरांची पडझड, वारा-पाऊस सुरूच
सिंधुदुर्गाला या चक्रीवादळाचा फटका बसला. जवळपास 137 घरांची चक्रीवादळामुळे पडझड झाल्याचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
 
सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की, "काल मध्यरात्रीपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांना फटका बसायला सुरुवात झाली. वारा-पाऊस सुरू झाला. सिंधुदुर्गातून वादळ आता रत्नागिरीपर्यंत पोहोचला आहे.
 
"या वादळाचा वेग सिंधुदुर्ग-रत्नागिरी दरम्यान काही ठिकाणी 64 किमी प्रति तास, तर काही ठिकाणी 70 किमी प्रति तास होता. प्रशासन सतर्क असल्यानं कुठेही जीवितहानी झाली नाही. मात्र, 137 घरांची पडझड झाली. शाळा, शासकीय कार्यालयं यांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. काही कुटुंबांना स्थलांतरित करावं लागलं," सामंत यांनी सांगितलं.
 
गोव्यात चक्रीवादळामुळे मोठं नुकसान, दोघांचा जीवही गेला
गोव्यात चक्रीवादळामुळे 500 हून अधिक झाडं कोसळली. तसंच, दोन जणांचा मृत्यूही झाला. शिवाय, 200 च्या आसपास घरांचं नुकसान झालं आहे.
 
झाडे उन्मळून पडल्यानं रस्तेही बंद पडले आहेत. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
दुसरीकडे, आज (16 मे) सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दादर नगर हवेलीचे प्रशासक यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला.
 
केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा
"अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील या दृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवली असून प्रशासन सज्ज आहे," अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिली.
चक्रीवादळात नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने केलेल्या तयारीबाबत सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही तसेच बॅकअप यंत्रणा लगेच कार्यान्वित होईल व रुग्णांच्या उपचारात अडथळा येणार नाही यासाठी सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्बो आणि इतर कोव्हिड केंद्रे ही पावसापासून संरक्षण करणारी असली तरी मोठे वादळ झाल्यास समस्या उद्भवू शकते, हे लक्षात घेऊन सावधगिरी म्हणून मुंबई तसेच इतरत्रही या केंद्रांतील रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे."
"सध्याच्या काळात ऑक्सिजनची गरज लक्षात घेता सागरी किनाऱ्यांवरील ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांमधील उत्पादन व वाहतूक सुरळीत सुरू राहील यासाठी नियोजन केले आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस यांना विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. किनाऱ्यांवरील कच्च्या घरांतील लोकांना दुसरीकडे हलविण्यात आल्याचेही ते म्हणाले, "मंत्रालय नियंत्रण कक्ष सज्ज असून इतरही जिल्ह्यातील नियंत्रण कक्षांशी त्यांचा व्यवस्थित समन्वय आहे," असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण
हे वादळ गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करत असून 18 मेच्या पहाटे गुजरातच्या पोरबंदर जवळून हे वादळ जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
 
हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून यांची माहिती दिली आहे.
तौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीपासून नैऋत्य दिशेला 300 किमीपेक्षा कमी अंतरावर आहे. आज (16 मे) गोव्यापासून साधारण 280 किमी अंतरावरून ते उत्तरेकडे सरकणार असल्याचा अंदाज आहे. गोव्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्गात याचा सर्वाधिक प्रभाव दिसू शकतो. परिणामी दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
 
दरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने प्रशासनाने सज्ज राहावे व मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी असं पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
 
उदय सामंत यांनी आज (16 मे) पहाटे यासंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं ते म्हणाले.
"तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आढावा बैठक संपन्न. सर्व अधिकारी नियंत्रण कक्षात असून वादळाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. या स्थितीचा कोव्हिड केंद्रांवर कसलाही परिणाम होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या," अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
 
मुंबई, ठाण्यातही पावसाचा इशारा
उत्तर कोकण म्हणजेच रायगड मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना 16 आणि 17 तारखांना मध्यम किंवा एखाद-दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल. पण वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटर असण्याची शक्यता आहे असं प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी सांगितलं, "मुंबई परिसरातही पुढील 24 तासात पावसाचा इशारा देण्यात आला असून शनिवारी रात्री काही ठिकाणी पाऊस पडला."
चक्रीवादळामुळे वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून, मुंबईतील दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलुंड येथील कोव्हिड आरोग्य केंद्रातील मिळून एकूण 580 कोविड बाधित रुग्णांचे महानगर पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
 
चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे 60 ते 80 किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो.
 
चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोव्हिड रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर केले जात आहे.
या कालावधीत मुंबई आणि परिसरात वेगवान वाऱ्यांसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या सर्व संबंधीत यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत.
 
पुढील 2 दिवस मुंबईतील लसीकरण बंद राहील, अशी माहितीही मुंबई महापालिकेने दिली आहे
नागरिकांनी प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवावं तसंच आवश्यक ती दक्षता बाळगावी, समुद्रकिनारी जाणं टाळावं, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलं आहे.
 
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (15 मे) किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी आणि यंत्रणांना सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज राहावं आणि मनुष्यबळ तसंच्या साधन सामुग्री तयार ठेवावी असंही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज (शनिवार) विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
 
हे वादळ मुंबईच्या जवळ येण्याची शक्यता असल्याने मुंबईत पुढील 2 दिवस मोठ्या प्रमाणात खबरदारी बाळगण्यात येत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दोन दिवस लसीकरणही बंद ठेवण्यात आलं आहे.
 
पण या तौक्ते वादळामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर शुक्रवार रात्रीपासून जोरदार वारे वहायला सुरुवात झालेली आहे.
 
18 मे च्या पहाटे हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे.
 
केरळच्या किनारपट्टीला शुक्रवारी जोरदार लाटा आणि पावसाने झोडपून काढलंय. तर गोव्यामध्येही रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात कुठेही लसनिर्मिती प्रकल्प झाला तरी आनंदच;भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी - अजित पवार