Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपूर विभागात १.३५ लाख हेक्टरवर नुकसान, शासन शेतकर्‍यांच्या खंबीरपणे पाठिशी

devendra fadnavis
, बुधवार, 20 जुलै 2022 (14:55 IST)
नागपूर विभागात सुमारे 1.35 लाख हेक्टरवर शेतीचे नुकसान झाले असून, शेतकर्‍यांना तातडीने मदत देता यावी, यासाठी संवदेनशीलपणे आणि वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली.
 
वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून नागपुरात पोहोचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काही ठिकाणी दुबार पेरणी सुद्धा वाया गेली आहे आणि शेती खरडल्या गेल्यामुळे तेथे पुन्हा पेरणी सुद्धा होऊ शकत नाही, त्यामुळे तेथे मदत देताना वेगळा विचार करावा लागणार आहे. गेल्यावेळी झालेल्या नुकसानीचे पैसे शेतकर्‍यांना मिळालेच नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे आता मदत जाहीर करताना तो भाग सुद्धा विचारात घ्यावा लागेल. सिंरोचात मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्याचा आम्ही यापूर्वी सुद्धा दौरा केला. तेथे अनेक गावांची कनेक्टिव्हीटी तुटते. त्यामुळे यासाठी दीर्घकाळ उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या कर्जपुरवठ्यासाठी निकराने प्रयत्न करावेत. सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी होते, त्यादृष्टीनेही नियोजन करा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
 
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या दौर्‍याचा प्रारंभ वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यापासून प्रारंभ केला. नाल्याला पूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान याठिकाणी झाले. त्या नुकसानीची पाहणी करीत स्थानिक शेतकर्‍यांशी त्यांनी संवाद साधला. राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. त्यानंतर हिंगणघाट येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. महाकाली नगर येथे नाल्याच्या पुराचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले, काही घरं जलमय झाली. या भागास भेट देत पाहणी करीत सर्व पीडित नागरिकांशी उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला.

हिंगणघाट नगरपरिषदेने अतिवृष्टीग्रस्त पीडितांसाठी निवार्‍याची व्यवस्था केली होती. त्याठिकाणी वास्तव्यास असलेल्या कुटुंबीयांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेत प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या. हिंगणघाट येथील वेणा नदीला आलेल्या पुराची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. या संपूर्ण दौर्‍यात आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, इतर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी सोबत होते. हिंगणघाट शहरातील जीबीएमएम हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे अतिवृष्टीग्रस्तांसाठी निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे,

तेथेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांचे दु:ख जाणून घेतले. मौजा कान्होली या गावाचा पुरामुळे संपर्क तुटला होता. गावांतील अतिवृष्टीग्रस्तांच्या निवार्‍याची सोय ग्रामपंचायतमध्ये करण्यात आली. या गावाला भेट देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाला निर्देश दिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपुरात व्यावसायिकाने पत्नी आणि मुलासह कार पेटवून स्वतःला पेटवले