बीडमधील मुलींच्या वाढत्या जन्मदरामध्ये पुन्हा एकदा काही प्रमाणात घट होताना दिसून आली आहे. बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर अत्यंत कमी होत असल्याची माहिती पीसीपीएनडीटीच्या सदस्यांनी जाहीर केली. या अहवालामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
काही वर्षांपूर्वी स्त्री भ्रूण हत्या प्रकरणात बीड जिल्ह्याचे नाव देशात गाजले होते. आता पुन्हा एकदा याच जिल्ह्यात मुलींच्या जन्माचा दर अत्यंत्य कमी आल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. कोव्हिड काळात मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात 1 हजार मुलांमागे केवळ 764 मुलींचा जन्म झाला आहे. कोव्हिड काळात पालकांनी मुलाच्या जन्माचा अट्टाहास केल्याने ही भयानक स्थिती उद्भवली असल्याचे, PCPNDT च्या अशासकीय सदस्या डॉ.आशा मिरगे यांनी सांगितले आहे.
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुका हा राज्यात सर्वात कमी मुलींचा जन्मदर असलेला तालुका म्हणून दहा वर्षांपूर्वी गणला जायचा. स्त्रीभ्रूणहत्या संबंधी एकूण कारवाई आणि प्रशासनाने घेतलेल्या काळजीमुळे नंतरच्या काळात बीड जिल्ह्यातील स्त्री जन्मदर 810 वरून थेट 961 पर्यंत वाढला होता. मात्र आता मागील तीन वर्षात काही प्रमाणात घट होत असल्याचे दिसून आले आहे. सन 2018-19 मध्ये जिल्ह्याचे स्त्री जन्मदराचे प्रमाण सर्वाधिक 961 होते. त्यानंतर सन 2019-20 मध्ये हे प्रमाण 747 इतकं झालं तर 2020-21 मध्ये हे प्रमाण 928 इतके झाले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुलींना नाकारले जात असल्याने जिल्ह्यात पूर्वीसारखीच स्थिती निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली. मुलींचा जन्मदर पुन्हा वाढविण्यासाठी प्रबोधन, जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.