सातारा : छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणाऱ्या सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महसूल विभाग आणि वनविभागाकडून या पाडकामाला सुरूवात झाली आहे. शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधत ही कारवाई केली जात आहे.
अफजलखान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यास आज पहाटेपासून सुरवात झाली आहे. यासाठी पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली ग्रामीण या चार जिल्ह्यामधील १८०० हून अधिक पोलीस वाई येथील पोलीस उपविभागीय कार्यालयामध्ये बुधवारी (दि. ९) रात्रीपासून दाखल झाले होते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास ही सर्व यंत्रणा प्रतापगडावर दाखल झाली. सकाळी सहा वाजल्यापासून अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरवात झाली आहे.
सातारा जिल्ह्यामधील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीशेजारी अलीकडच्या काही वर्षात उदात्तीकरण करण्यात येत होते. तेथे उरूस देखील भरविण्यास सुरवात झाली होती. तेथील उदात्तीकरण रोखण्याची मागणी करण्यात आली होती. आज पहाटे तारखेप्रमाणे आलेल्या शिवप्रतापदिनीच राज्य सरकारकडून यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफझलखान कबरीलगतचे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू झाले आहे.
दरम्यान, प्रतापगड, महाबळेश्वर, कराड, वाई, सातारा येथे देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरामध्ये जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्यात आले आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील चौधरी, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे आदी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. माध्यम प्रतिनिधींना परीसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अफजलखानाच्या कबरी शेजारी उदात्तीकरण करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीमध्ये अनेक खोल्यांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. ते बांधकाम पाडून टाकण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. न्यायालयाने देखील हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सातारा प्रशासनाने हे बांधकाम हटवण्याची कारवाई आज पहाटेपासून सुरु केली आहे.
Edited by Ratnadeep Ranshoor