नाशिकसाठी एक सन्मानाची गोष्ट घडली आहे. अवयवदान चळवळीसाठी अथक काम करणारे श्री. सुनील देशपांडे यांनी रचलेली अवयवदानाची "अवयवदान प्रतिज्ञा" आता राज्य सरकारची अधिकृत प्रतिज्ञा घोषित करण्यात आली आहे. या अवयवदान प्रतिज्ञेला शासकीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.
यापुढे ती राज्याची शासकीय अवयवदान प्रतिज्ञा असणार आहे. याबाबत सरकारने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. यापुढे सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या महाअवयवदान अभियानासाठी त्याचा सर्वत्र वापर केला जाणार आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालय, शासकीय कार्यक्रम आदी ठिकाणी याचे वाचन होणार आहे.
यामध्ये अवयवदान प्रतिज्ञामध्ये माणुसकीची शिकवण देत अवयवदान व्हावे यासाठी प्रयत्न करत राहणार यावर भर देत जनजागृती करण्यात येणार आहे. अतिशय बोलकी आणि सोप्या शब्दात ही अवयवदान प्रतिज्ञा आहे.
सुनील देशपांडे यांच्या विषयी :
नुकत्याच काही महिन्यापूर्वी देशपांडे यांनी अवयवदान जनजागृतीसाठी नाशिक- ते आनंदवन असा सुमारे ११00 किमीचा प्रवास पायी केला होता. यांमाध्यमातून अवयवदान चळवळ त्यांनी उभी केली आहे. आता विविध माध्यमातून समाजामध्ये अवयव दान करण्यासाठी जनजागृतीसाठी काम सुरु केले आहे. शाळा महाविद्यालय, संस्था आदी सार्वजनिक ठिकाणी लोकांशी संवाद साधत, अवयव दानासाठी लोकांना प्रवृत्त करत आहे.त्यांच्या या कामामध्ये त्यांच्या पत्नी सौ.रंजना देशपांडे यांचा सिंहाचा वाटा आहे.
राज्य सरकारने २०१६ साली, समाजामध्ये अवयवदाना विषयी जनजगृती व्हावी या साठी राज्य पातळीवर महाअवयव दान अभियान राबवले होते.आता २०१७ मध्ये देखील महा अवयवदान मोहोत्सव सरकार राबवणार आहे. दि.२९\०८\२०१७ ते ३०\८\२०१७ या दिवशी हा मोहोत्सव पूर्ण राज्यात आयोजित केला जाणार आहे.
महा अवयवदान अभियानांतर्गत शासन
परीपत्रक क्र. जागृती-0716/प्र.क्र.32
अधिनियम दि.19 ऑगस्ट 2017पृष्ठ8 पैकी 8
'माणुसकी हा माझा मूळ धर्म आहे. पीडीतांच्या व गरजूंच्या जीवनात आनंद फुलवणे हीच माणुसकीची खरी शिकवण आहे अशी माझी श्रद्धा आहे.
अवयवदानामुळे गरजू रुग्णांच्या जीवनात आनंद फुलविणे शक्य होते तसेच मृत्यूपंथाला लागलेल्या व्यक्तीला नवा जन्म देता येतो. त्यामुळे हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे यावर माझा विश्वास आहे.
मी प्रतिज्ञा करीत आहे की माझ्या शरीरात जे जे अवयव दुसऱ्या मानवाच्या जीवनात आनंद फुलवू शकतील अशा अवयवांवर माणुसकीचा पहिला हक्क व अधिकार असेल.
माझ्या अवयवांचा अशा माणुसकीच्या पुण्यकार्यासाठी उपयोग झाला पाहिजे असा माझा आग्रह आहे.
माझ्या पुढील पिढ्यांनी या आग्रहाचा मान राखावा म्हणून मी त्यांना सतत स्मरण देत राहीन आणि पुढील पिढ्यांवर असेच संस्कार व्हावेत यासाठी मी प्रयत्नशील राहीन.'