राज्य मंत्रिमंडळाच्या आक्षेपानंतरही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा पूर्वनियोजित मराठवाड्याचा तीन दिवसांचा दौरा आजपासून सुरू होत आहे. या दौऱ्यात तिन्ही जिल्ह्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. तर तिन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री या वेळी उपस्थित राहणार नाहीत.
राज्यपाल कोश्यारी हे गुरुवारपासून तीन दिवस नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेणार आहेत. यालाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्षेप घेण्यात आला. याबाबत मंत्रिमंडळाची नापसंती राज्यपालांना कळविण्यात आली. करोना, पूर परिस्थिती आदी सर्व महत्वाचे विषय राज्य सरकार योग्यपणे हाताळत असताना राज्यपाल बैठका का घेत आहेत, असा सवाल अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी घेतला होता. दोन सत्ता केंद्रे निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आक्षेपही मंत्रिमंडळाने घेतला होता. मंत्रिमंडळाच्या आक्षेपानंतरही राज्यपालांचा दौरा पूर्वनियोजित कार्यक्र मानुसारच होईल, असे राजभवनच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
राज्यपाल किं वा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्याने उपस्थित राहणे हे संके त असतात. वर्धा जिल्हा दौऱ्याच्या वेळी पालकमंत्री रणजित कांबळे अनुपस्थित राहिल्याने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कांबळे यांचे पालकमंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी के ली होती. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांच्या दौऱ्याच्या वेळी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण व परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक हे उपस्थित राहणार नाहीत. तर हिंगोलीतही पालकमंत्री उपस्थित राहणार नसल्याचे समजते.