मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन दिलेल्या आश्वासनानंतर आता करमाळ्यातल्या नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं आहे. याआधी मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, अशी चिठ्ठी लिहून धनाजी चंद्रकांत जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यानंतर पालकमंत्री विजय देशमुख यांनी शेतकऱ्याच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन बोलणं करुन दिलं. मुख्यमंत्र्यांनी पीडित जाधव कुटुंबियांतील मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि तातडीनं आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं. एका मुलाला नोकरी आणि दुसऱ्या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार करणार आहे. तसंच जाधव कुटुंबाला तातडीने एक लाख रुपये मदत आणि त्यानंतर पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे. जाधव कुटुंब अल्पभूधारक असल्यानं, शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.