परमबीर सिंह यांच्याप्रमाणे राज्य सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांवरही कारवाई करण्याची हिंमत दाखवावी असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ठाकरे सरकार जे खरे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यामध्ये मागे पुढे पाहत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तुमच्या पक्षातील लोकांना कारवाईपासून वाचवाल हे योग्य नाही. तसेच ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावरुनही देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. फडणवीस म्हणाले की, परमबीर सिंह यांच्यावर कारवाई केली तसेच ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांच्यावर कारवाई करण्यात हिंमत का दाखवत नाही. नाहीतर तुमच्या सरकारविरोधात जो बोलतो त्यांच्यावर कारवाई कराल आणि तुमच्या पक्षातील भ्रष्टाचारी लोकांना वाचवाल हे योग्य नाही.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावर फडणवीस म्हणाले की, मी सुद्धा पाच वर्ष मुख्यमंत्री होतो महाराष्ट्रात वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री येत असतात. उद्योगाच्या बाबतीत चर्चा करतील परंतु उद्योग जातील असे नाही. मागील काळात ते गेले नाही. मात्र जेव्हा जेव्हा या पुर्वी कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री यायचे तेव्हा महाराष्ट्रातील उद्योग पळवण्यासाठी आले असल्याचा कांगावा करायचे. आता तेच ममता बॅनर्जी यांचे स्वागत करत आहेत. माझं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्रातील उद्योग कुठे जाणार नाहीत परंतु महाराष्ट्रातील प्रशासनाचे जे अपयश आहे त्यामुळे हे उद्योग निश्चित बाहेर जातील असे फडणवीस म्हणाले.