राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी कालच्या राज ठाकरे यांच्या सभेनंतर विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर शरद पवारांना विचारले असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शरद पवार यांनी यावेळी राज यांच्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला.
पुरंदरेंच्या सांगण्यावरुनच जेम्स लेनकडून गलिच्छ लिखाण
राज ठाकरे यांनी पुरंदरे यांच्यामुळेच शिवाजी महाराज घराघरात पोहचल्याचे सांगत जातीच्या आधारावर इतिहास पाहिला जात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर शरद पवार पुढे म्हणाले की, जेम्स लेनचं गलिच्छ लिखाण हे बाबासाहेब पुरंदरेंच्याच माहितीवर आधारित होते. आपण जे लिखाण केलं, त्याची माहिती पुरंदरेंकडून घेतल्याचं लेन यांनी घेतली होती. जेम्स लेनने हे उघड सांगूनही पुरंदरे यांनी त्याचा खुलासा केला नाही. त्यामुळे मी पुरंदरेंवर टीका केली असेल, तर मला त्याचं दुःख नाही, तर अभिमान वाटतो. त्यामुळे यावर कुणी काय म्हटलं असेल, तर मला त्याबद्दल काही सुचवायचे नाही, असे म्हणत शरद पवार यांनी राज ठाकरे यांना बुधवारी उत्तर दिले.
शिवाजी महाराजांना जितामातेनेच घडवले
शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना जिजामातेनं शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व घडवलं हे सांगण्याऐवजी दादाजी कोंडदेव यांनी योगदान दिलं असं सांगितलं. त्याला माझा सख्त विरोध होता. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व हे राजमाता जिजामातेने कष्टानं उभं केलं. त्या व्यक्तिमत्त्वाचं मोठेपण या पदापर्यंत पोहोचायला कुणाचं योगदान होतं तर ते जिजाऊंचं होतं. पण पुरंदरेंनी त्याबाबत वेगळं मत मांडलं. ते योग्य नव्हतं. ते माझं मत आजही आहे आणि तेव्हाही होतं.