नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये नोकरीवर कायम असणाऱ्या शिक्षकांनी चक्क आपल्या जागेवर भाडोत्री शिक्षकांची नियुक्ती केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. लाखभर पगार असतांना केवळ 1500 रुपये देऊन भाडोत्री शिक्षकाची नेमणूक करायची, आणि स्वत: घरात बसून पूर्ण पगार घ्यायचा असा प्रकार मालेगाव महापालिका शिक्षण मंडळाच्या एका उर्दू शाळेत सुरु आहे.या शाळेत तपासणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हा धक्कादायक प्रकार आढळून आला आहे.
मालेगावमध्ये महापालिकेची उर्दू शाळा क्रमांक 47 मध्ये दोन भाडोत्री शिक्षक ज्ञानदान करत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांना आढळून आले. त्यातील एक महिला मुख्याध्यापकांच्या वर्गावर शिकत होती. तर दुसरा एक शिक्षक दुसऱ्या वर्गावर ज्ञानदान करत होता. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीत हा भांडाफोड झाला. या प्रकाराची पालकांना सुद्धा माहिती नव्हती.
याबाबत मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त राजू खैरनार म्हणाले की, महापालिकेच्या शाळेत भाडोत्री शिकवत शिकवत असल्याची तक्रार आली होती. त्यानंतर आम्ही पाहणी केली. तेव्हा दोन नोकरीवर नसलेले शिक्षक नोकरीवर कायम असलेल्या शिक्षकांच्या जागेवर शिकवत असल्याचे समोर आले आहे. याबाबत पंचनामा करून अहवाल आयुक्तांकडे सादर केला आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.