Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संप मागे घ्या, दिवाळीत प्रवाशांची गैरसोय नको

संप मागे घ्या, दिवाळीत प्रवाशांची गैरसोय नको
मुंबई , बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (09:30 IST)
ग्रामीण भागात दिवाळीच्या काळात लोक प्रवासासाठी एसटीवर अवलंबून असतात. यापुर्वीच्या दर दिवाळीला एसटी कर्मचाऱ्यांनी आपली दिवाळी सोडून जनतेची सेवा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीबाबत आम्ही पूर्ण सकारात्मक आहोत. पण त्यासाठी चर्चा करण्याऐवजी लोकांची गैरसोय करणे योग्य नाही. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेला संप तातडीने मागे घ्यावा, लोकांना आनंदाने घरी जाऊन दिवाळी साजरी करु द्यावी, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.
 
संप करणे, मागण्या करणे हा कर्मचाऱ्यांचा लोकशाही हक्क आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत आम्ही नेहमीच सकारात्मक आहोत. पण यासाठी कर्मचाऱ्यांची मागणीही वाजवी असली पाहिजे. महामंडळाचे उत्पन्न किती आहे, त्यांना किती पगारवाढ देणे शक्‍य आहे हे लक्षात घेऊनच मागणी करणे गरजेचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत मुख्यमंत्र्यांनीही पूर्ण सकारात्मकता दाखविली आहे. त्यासाठी त्यांनी समिती स्थापन केली असून त्यात एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे. या संघटनांनी समितीसोबत चर्चेसाठी पुढे यावे,समितीमध्ये निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना निश्‍चित वेतनवाढ दिली जाईल, असे रावते म्हणाले.
 
खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस परवानगी
संपकाळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्यातील सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहितीही मंत्री श्री. रावते यांनी दिली आहे. तसेच संपकाळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी बसेसना एसटी बसस्थानकांतून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आज दुपारी 2 वाजेपर्यंत साधारण 3 हजार 858खासगी वाहने प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध झाली असून त्यात वाढ होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
आवश्‍यकता भासल्यास हस्तक्षेप करणार – मुख्यमंत्री 
एसटीसंपाबाबत आपण संघटनांशी सखोल चर्चा केली आहे.एसटी कर्मचारी संघटना आमचे म्हणणे मान्य करतील अशी अपेक्षा आहे. ते हा संप ताणतील असे वाटत नाही. लवकरच ते हा संप मागे घेतील अशी अपेक्षा त्यांनी वयक्‍त केली. बेस्ट संपाबाबत आपण मुंबई महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यांच्याशी चर्चा केली आहे. आवश्‍यकता भासल्यास याप्रकरणीही मी हस्तक्षेप करेन असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बुधवारी करा हे उपाय (व्हिडिओ)