पुण्यातील डॉ. मिलींद भोई यांनी सामाजिक भान राखतं आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात खर्च कमी करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला नवीन घर बांधून दिलं आहे. नांदेडच्या अर्धापूर शहरातील कृष्णा नगर भागात या घराचं बांधकाम सुरु असून लवकरच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब या घरात रहायला जाणार आहे. डॉ. मिलींद भोई यांच्या मुलीचं आज पुण्यात लग्न पार पडलं आहे.
अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पुण्यातील शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून पुण्यजागर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामाध्यमातून शेतकरी कुटुंबातील पाल्यांना शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच या प्रतिष्ठान कडून असे कुटुंब सुशिक्षित व आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केला जातोय.
एकीकडे लाडक्या लेकीच्या लग्नाची तयारी सुरु असतानाही डॉ. भोई यांनी अर्धापूर शहरात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घराचं बांधकाम थांबणार नाही याची काळजी घेतली. शहरातील अहिल्यादेवी नगरांत राहणाऱ्या लक्ष्मी साखरे यांच्या पतीने नापिकी व कर्ज बाजारीला कंटाळून आत्महत्या केली होती.त्यांना दोन छोट्या मुली व एक मुलगा आहे.अत्याल्प शेती, घरात कर्ता पुरुष नाही, अडचणींचा डोंगर, पाल्यांचे शिक्षण आदी अडचणीतून हे कुटुंब मार्ग काढत असताना त्यांच्या मदतीला भोई प्रतिष्ठान धावून आले. डॉ. भोई यांच्या उपक्रमाचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.