Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हलगर्जीपणा करु नका, लोकांचे जीव वाचवण्यासाठी कोरोना साखळी तोडणे गरजेचे- अजित पवार

हलगर्जीपणा करु नका, लोकांचे जीव वाचवण्यासाठी कोरोना साखळी तोडणे गरजेचे- अजित पवार
, शनिवार, 10 एप्रिल 2021 (14:56 IST)
बारामती- प्रशासनाने अनेक उपाययोजना करूनही बारामती शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका. कोरोनाची साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत. त्यामुळे हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.
 
बारामती  येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात 'कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक' आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 
 
सद्यस्थितीत बारामती तालुक्यात शासन आणि प्रशासन यांच्या मार्फत विविध उपाययोजना करून देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब चिंतेची असून कोरोना साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांर्भीयाने घेणे आवश्यक आहे. बारामती  तालुक्यातील प्रत्येक रूग्णालयाचे फायर ऑडीट प्राधान्याने करून घेण्यात यावे. प्रशासनाने याबाबत खबरदारी घ्यावी, असेही अजित पवार म्हणाले. 
 
सांगली जिल्ह्यात मोबाईल कोरोना चाचणी व्हॅन प्रत्येक गावात जावून नागरिकांची कोरोनाची तपासणी केली जाते, त्याच धर्तीवर बारामती तालुक्यातही मोबाईल व्हॅन द्वारे कोरोना तपासणी करण्यात यावी. रूग्णांना कोणताही भेदभाव न ठेवता तात्काळ बेड उपलब्ध करून देण्यात यावे. बारामती तालुक्यातील वृध्दाश्रमामध्ये जावून तेथील वृध्दांची व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी. आरोग्य सेवेकरीता मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास शिक्षकांच्या सेवा घेण्यात याव्यात. कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसामुग्री याची कमतरता भासल्यास औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांची मदत घ्यावी. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध लावले असतानादेखील नागरिकांकडून निर्बंधांचे पालन केले जात नाही, हे योग्य नाही. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. जे नागरिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत नाहीत, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा तसेच मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे व प्रशासनास सहकार्य करावे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बारामती येथील पदाधिकारी , वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आयुष प्रसाद यांनी ज्या भागामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव जास्त आहे त्याठिकाणी कडक निर्बंध करावेत.आरोग्य विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही.भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खासगी रूग्णालयामधून करार पध्दतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात आले आहे. कोरोना रूग्णांचे एक्स-रे करणे आवश्यक आहे. औषधांची कमतरता भासू देणार नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे. जिल्हा परिषदेने बेड मॅनेजमेंटसाठी ॲप तयार केले आहे त्याचा वापर करावा. सुपर स्प्रेड गावनिहाय यादी करावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे. शाळांमध्ये क्वॉरंटाईन सेंटर चालू करण्यात यावेत, इत्यादी सूचना यावेळी दिल्या.  
 
यावेळी जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक राहूल पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबिली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, रुई रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी  उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती शहरासह तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CSK vs DC IPL 2021 : चेन्नई विरुद्ध दिल्ली दरम्यानचा दुसरा सामना