Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या

तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या
, सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (22:06 IST)
कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केले आहे.
 
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू.
 
मुख्यमंत्री पुढे म्हणतात की, ‘हे उघडा ते उघडा’ या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच माझ्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल.
 
मला वारंवार आपणांस हे आवाहन एवढ्याचसाठी करावे लागते आहे, कारण कोविड परत वाढतोय. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तर त्यांना तालिबाननं चौकात फटके मारले असते.. : मुनगंटीवार