जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा बिबट्यानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
नुकतेच कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी व चांदेकसारे परिसरात बिबट्याच्या दहशतीने शेतकर्यांना आपल्या शेतात जाणे कठीण बनले आहे.
या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने सोनेवाडी परिसरात पिंजरा बसवावा अशी मागणी नागरिक करू लागले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,पंचकेश्वर परिसरात संजय मोहन गुडघे यांच्या उसाच्या शेतात गेल्या दोन दिवसांपासून हा बिबट्या दबा धरून बसलेला आहे. एकेदिवशी नवनाथ गुडघे हे आपल्या शेतात जनावरांसाठी घास कापत असताना त्यांना हा बिबट्या दिसला.
त्यांनी आसपास असलेल्या शेतकर्यांनाही याबाबत महिती दिली. या बिबट्याने एक कुत्रा व कालवडीची शिकार केली. गेल्या अनेक दिवसांपासून हा बिबट्या चांदेकसारे, सोनेवाडी पोहेगाव पंचकेश्वर शिवारात मुक्त संचार करीत असल्याने,शेतकरी भयभीत झाले आहेत. वनविभागाने तात्काळ या परिसरात पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी पोलीस पाटील दगु गुडघे यांनी केली आहे.