Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दसरा मेळावा : बाळासाहेबांचा विचार जाऊ तिथे नेऊ, त्यासाठी शिवाजी पार्कची गरज नाही- एकनाथ शिंदे

दसरा मेळावा : बाळासाहेबांचा विचार जाऊ तिथे नेऊ, त्यासाठी शिवाजी पार्कची गरज नाही- एकनाथ शिंदे
, बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (13:58 IST)
प्राजक्ता पोळ
'हिंदू सणांवेळी एकमेकांमधील वाद टाळता' यावा म्हणून एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क सोडून इतरत्र होणार आहे.
 
उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे.
 
“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेली 50 वर्षे शिवतीर्थावरून ज्वलंत हिंदुत्वाचे विचार अखंड देत आले. यावर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच उत्साहात व्हावा आणि हिंदूसणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा म्हणून शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दसरा मेळावा अन्य ठिकाणी होणार असल्याचे जाहीर करून सामंजस्याची भूमिका घेतली, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली.
 
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानासाठीचा अर्ज मागे घेत आहोत, असंही सरवणकर यांनी मंगळवारी (10 ऑक्टोबर) सांगितलं.
 
शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजे 1966 पासून 'दसरा मेळावा' मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क मैदानात पार पडतो. या मेळाव्याला शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे.
 
मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून, पक्षात उभी फूट पाडली. 40 आमदारांसह पक्षाचं नाव आणि चिन्ह घेऊन शिंदे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. तिथे त्यांनी थेट महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मिळालं.
 
या बंडानंतर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन गटात कधी शाखेवरून तर कधी आणखी कशावरून वादावादी होतच राहिलीय. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या जागेचा मुद्दाही त्यातलाच.
 
तरीही गेल्यावर्षी म्हणजे 2022 रोजी ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानाची जागा दसरा मेळाव्यासाठी मिळाली. मात्र, त्यासाठी ठाकरे गटाला मुंबई हायकोर्टाचे दार ठोठावावे लागले होते.
 
येत्या 24 ऑक्टोबर 2023 रोजी यंदाचा दसरा आहे. यानिमित्त ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकले होते. पण आता हा वाद मिटल्याचं दिसतंय.
 
गेल्यावर्षीही (2023) दोन्ही गटांमध्ये दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी राजकीय संघर्ष बघायला मिळाला होता.
 
गेल्यावर्षीच्या संघर्षानं मुंबई हायकोर्टाची पायरी चढली होती.
 
यंदा ठाकरे गटाकडून शिवाजी पार्क मैदानासाठी दीड महिन्यांपूर्वी अर्ज केला होता.
 
तर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही अर्ज केला होता. त्यामुळे शिंदे की ठाकरे, कुणाला परवानगी द्यायची, असा पेच मुंबई महापालिकेसमोर उभा राहिला होता.
 
पण आता शिंदे गटाने शिवाजी पार्कसाठीचा अर्ज मागे घेतला आहे.
 
बाळासाहेबांनी जिथे अंगार फुलवले तिथे भंगार ऐकायला कोण जाणार?- मुख्यमंत्री शिंदे
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा शिवाजी पार्क सोडून अन्यत्र घेण्याबद्दलच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
 
एकनाथ शिंदे यांनी एक्सवर आपली भूमिका मांडताना म्हटलं की, बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ.
 
आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला आहे.
 
'छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांनी अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार,' असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
 
कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार ? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
 
"ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून हिदूत्वाची अँलर्जी असलेल्या काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही.
 
बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती," असं म्हणत आझाद मैदान आणि क्रॉस मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
 
शिवाजी पार्कसाठी शिंदे-ठाकरे गटाचे अर्ज
ठाकरे गटाचे दादरचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्याकडून शिवाजी पार्क मैदान 'शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे' पक्षासाठी मिळावा म्हणून अर्ज करण्यात आला होता.
 
महेश सावंत यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचीत केली तेव्हा त्यांनी म्हटलं होतं, "मागच्या वर्षी थाटामाटात आम्ही शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा केला होता. मुंबई महापालिकेने आम्हाला शेवटपर्यंत शिवाजी पार्कसाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो. मागच्या वर्षीचा न्यायालयाचा निकाल आमच्याकडे आहे. त्याची परवानगी आम्ही या वर्षीच्या पत्रात जोडली आहे."
 
तसंच, महेश सावंत यांनी पुढे म्हटलं होतं की, "दीड महिन्यापूर्वीच आम्ही दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी द्यावी असं पत्र मुंबई महापालिकेला दिलंय. त्यामुळे यावर्षी आम्हाला शिवाजी पार्क दसरा मेळाव्यासाठी मिळण्यात अडचण येणार नाही, असा विश्वास आहे."
 
आता सरवणकर यांनी अर्ज मागे घेतल्याने उद्धव ठाकरेंचं दरसा मेळाव्यातील 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो' या वाक्याने सुरू होणारं भाषण शिवाजी पार्कवरच होणार आहे.
 
मागच्या वर्षी काय झालं होतं?
गेल्यावर्षी मुंबई महानगरपालिकेने एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांना शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारली होती.
 
दोन गटाकडून परवानगीसाठी अर्ज आल्याने आम्ही पोलिसांचा अभिप्राय मागवल्याचं मुंबई महापालिका प्रशासनाने म्हटलं होतं.
 
शिंदे गटाचे अर्जदार आमदार सदा सरवणकर यांच्या अर्जाला उत्तर देताना मुंबई महानगरपालिकेने म्हटलं होतं, 'कायदा आणि सुव्यवस्था यादृष्टीने आम्हाला पोलिसांचा अभिप्राय हवा होता. त्यानुसार शिवाजी पार्क पोलीस स्टेशनने म्हटलंय की, कोणत्याही एका अर्जदाराला परवानगी दिल्यास शिवाजी पार्क संवेदनशील परिसरात कायदा, सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा पोलिसांचा अभिप्राय पाहता तुमचा परवानगी अर्ज आम्ही नामंजूर करत आहोत.'
 
मुंबई महापालिकेच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पालिकेच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.
 
उद्धव ठाकरे यांच्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी युक्तिवाद करताना ठाकरे गटाच्या वकीलांनी आपली बाजू मांडताना म्हटलं, "दसरा मेळावा शिवसेनेकडून गेले कित्येक वर्षापासून घेतला जातो.
 
यासाठी सरकारकडून परवानगी दिली जाते, अनिल देसाई दरवर्षी मागणी करतात. यावेळी 20 दिवस आम्हाला उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आम्ही याचिका दाखल केली. सदा सरवणकर यांनी एक अर्ज दिला. त्यामुळे परवानगी नाकारली. हे योग्य कारण नाही.
 
कायदा सुव्यवस्था सरकारचा प्रश्न आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावं. हे कारण देत माझा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. दसरा मेळाव्याला कधीच खंड पडला नाही. यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे कारण अत्यंत चुकीचं आहे.”
 
दुसरीकडे, शिंदे गटाच्या वकीलांनी युक्तिवाद केला होता की, "शिवेसना आमचीच आहे. शिवसेना नावाचा दुसरा कोणताही गट राज्यात अस्तिवात नाही. अनिल देसाईंची याचिका माझ्या अपरोक्ष दाखल करण्यात आली. त्यांच्याशिवाय दुसरा कोणता गट नाही असं गृहीत धरून ही याचिका दाखल केली. माझी याचिका शिवसेनेकडून आहे. सद्यस्थितीत राज्यात शिवसेना सत्तेत आहे.”
 
या राजकीय वादात मुंबई महापालिकेने नोटिशीला उत्तर देताना जे मुद्दे मांडले. त्याच मुद्यांवर कोर्टात युक्तिवाद केला होता.
 
ते म्हणाले, "शिवाजी पार्क हे मैदान शांतता क्षेत्रात मोडतं, ते खेळाचं मैदान आहे. त्यामुळे कायद्याला अनुसरुन आम्ही परवानग्या नाकारल्या आहेत. तसेच कोणालाच मला हीच जागा हवी, असं म्हणण्याचा अधिकार नाही. इथं मेळावा झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा अहवाल आल्यामुळे परवानगी नाकारली."
 
या सर्व युक्तिवादानंतर मुंबई हायकोर्टाने महापालिकेचा परवानगी नाकारण्याचा आदेश रद्द ठरवला आणि उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली.
 
उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. एकनाथ शिंदे यांच्याकडून वांद्र्याच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मैदानावर दसरा मेळावा घेण्यात आला होता.
 
यावर्षी मुंबई महापालिका कोणाच्या बाजूने निर्णय देते, हे पाहणं महत्वाचं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Allegations against Dada Bhuse दादा भुसे यांच्यावर आरोप