Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात पावसाचा जोर कमी होणार, पण ‘या’ जिल्ह्यात बरसणार; पंजाबरावांचा हवामान अंदाज

राज्यात पावसाचा जोर कमी होणार, पण ‘या’ जिल्ह्यात  बरसणार;  पंजाबरावांचा हवामान अंदाज
, गुरूवार, 28 जुलै 2022 (14:39 IST)
भारतीय हवामान विभागाच्या मते, राज्यात पावसाचा  जोर कमी होणार आहे, राज्यातील अनेक भागात आता पावसाची उघडीप बघायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, मान्सूनचा आस म्हणजेच कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला असल्याने राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.
 
यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना काही काळ शेतीची कामे करता येणार आहेत. दरम्यान, राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी राज्यातील विशेषता विदर्भात पाऊस अधून मधून बरसत आहे.
 
भारतीय हवामान विभागाच्या मते, आज देखील पूर्व विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील बरसणार आहे.
 
दरम्यान, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आपल्या हवामान अंदाजासाठी आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडणारे पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज  सार्वजनिक करण्यात आला आहे. पंजाबराव डख यांनी वर्तविलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज 28 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर कमालीचा ओसरणार आहे.
 
28 29 आणि 30 जुलै रोजी राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र या दरम्यान राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे देखील डख यांनी स्पष्ट केले पंजाबराव  यांच्या मते, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सोलापूर आणि मराठवाड्यातील नांदेड उस्मानाबाद लातूर या जिल्ह्यात सर्वदूर नाही पण काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.
 
निश्चितच पंजाबराव यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार विदर्भातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून, पावसाची उघडीप बघायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात अतिवृष्टी सारख्या पावसामुळे झालेली पूरस्थिती आता नियंत्रणात आली आहे.
 
विदर्भात अधिक प्रमाणात अतिवृष्टी झाली असल्याने जगातील अनेक जिल्हे पाण्याखाली गेले होते. मात्र आता गेल्या आठवडाभरापासून पावसाची उघडीप असल्याने विदर्भातील पूरस्थिती पूर्णतः नियंत्रणात आले असून जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत झाले आहे.
 
शेतकरी बांधव देखील आता शेतीच्या कामासाठी लगबग करत आहेत. दरम्यान विदर्भात असे अनेक शेतकरी बांधव आहेत ज्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे तर विदर्भात असेही अनेक शेतकरी बांधव आहेत ज्यांना तिबार पेरणी देखील करावी लागत आहे. निश्चितच आता भारतीय हवामान विभाग तसेच पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मासेमारी बंदीच्या कालावधीत यांत्रिक नौकांव्दारे मासेमारी, नौका मालकांवर दंडात्मक कारवाई