काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि बहिण यांच्या घरी आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यानंतर आज पुन्हा अजित पवार यांचे मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीने सकाळीच छापा टाकला आहे. दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारा संदर्भात ही छापेमारी करण्यात आली आहे.
जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. जगदीश कदम यांच्या सहकार नगरमधील घरावर ईडीने धाड टाकली. विशेष म्हणजे ज्यावेळी ईडीच्यावतीने धाड टाकण्यात आली त्यावेळी जगदीश कदम हे मुंबई येथे होते.
दौंड सहकारी साखर कारखान्यावर यापूर्वीही ईडीच्यावतीने कारवाई करण्यात आली होती. या कारखान्यावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले होते.