भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली होती. यानंतर ते आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. तत्पूर्वी ते पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत. काहीवेळापूर्वीच ते पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.
महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर आता भाजपमधील अंतर्गत वाट चव्हाट्यावर येऊ लागले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यामुळे हे दोन्ही नेते नजीकच्या काळात भाजपला धक्का देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी खडसे यांना तशी ऑफरही देऊ केली. एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईल. त्यामुळे आमच्या पक्षाची ताकद वाढेल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.