Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकनाथ शिंदे : रिक्षावाला ते बाळासाहेबांचा शिवसैनिक ते थेट मुख्यमंत्री

eaknath shinde
, गुरूवार, 30 जून 2022 (17:37 IST)
एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपनं त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आज साडेसात वाजता त्यांचा शपथविधी होतील. नंतर इतर मंत्री शपथ घेतील, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली.
 
मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाल्यावर शिंदे म्हणाले
"मी खऱ्या अर्थाने आज राज्याचा विकास घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. शिवसेना पक्ष म्हणून जे काही आमदार आहेत, जवळपास 50 आमदार आम्ही एकत्र आहोत. एक वैचारिक भूमिका, एक राज्याचा विकास आणि जे काही अडीच वर्षापूर्वी घडलं ते आपल्याला माहिती आहे.
 
विकास प्रकल्प असतील, वारंवार माहिती दिली, मी देखील अनेक वेळा त्यांच्याबरोबर चर्चा केली. जी काही नैसर्गिक युती होती आपण एकत्र निवडणुका लढवल्या, महाविकास आघाडी स्थापन झाली. मतदारसंघातले प्रश्न, निवडणुकीत येणाऱ्या अडचणींच्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला.
 
पन्नास आमदार वेगळी भूमिका घेतात याचा अर्थ, याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज होती. आमदार आहेत, त्यांनी मला समस्या सांगितल्या. आम्ही प्रयत्न केला पण यश मिळालं, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. त्या निर्णयाबरोबर फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला त्यांच्याकडे 120 चं संख्याबळ आहे.
 
मात्र मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना जो पाठिंबा दिला त्यामुळे त्यांचे आभार. ही एक ऐतिहासिक घटना आहे. जे घडलंय ते वास्तव आपल्यासमोर आहे. जी काही अपेक्षा आपल्यासमोर आहे. ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र एक करू ते देखील ताकदीचे आमदार आहे.
 
अशा परिस्थितीत 50 आमदारांनी जी लढाई लढले आहेत, त्यांचे आभार. विश्वासाला तडा माझ्याकडून जाणार नाही ही ग्वाही मी देतो. एक मजबूत सरकार आम्ही देऊ. ज्या राज्याबरोबर केंद्र सरकारची ताकद उभी राहते ते सरकार मजबूत आहे."
 
एकनाथ संभाजी शिंदे यांचा वादळी प्रवास
ठाण्यामधील कोपरी-पाचपाखाडीचे आमदार एवढीच त्यांची ओळख नसून गेली अनेक दशके ते शिवसेनेत संघटन वाढवणारे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेत गेले आहेत.
 
एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षं शिवसेनेत कार्यरत आहेत. ठाण्यातल्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून ते निवडून आलेत. ठाणे महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम केल्यानंतर 2004 पासून ते विधानसभेवर निवडून जात आहेत. पण त्यांचा हा प्रवास सुरु झाला होता रिक्षाचालकापासून.
 
ठाणेवैभव या वृत्तपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ एकनाथ शिंदेची ओळख 'आक्रमक शिवसैनिक ते शाखाप्रमुख ते जबाबदार मंत्री' अशी करून देतात.
 
मिलिंद बल्लाळ एकनाथ शिंदेंविषयी सांगतात, "सातारा हे एकनाथ शिंदेंचं मूळ गाव. ते ठाण्यात आले ते आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी. मात्र घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना आपलं शिक्षण अर्ध्यातच सोडावं लागलं. आता हाताला नोकरी हवी म्हणून त्यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली. पुढे ते ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले."
 
"वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात हिरहिरीने सहभाग घेऊन आक्रमक भूमिका घेणाऱ्या एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंची कृपादृष्टी झाली आणि शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शाखाप्रमुख झाले.
 
त्यानंतर 1997 मध्ये आनंद दिघेंनी शिंदेंना ठाणे महापालिकेचं तिकीट दिलं.
 
आपल्या पहिल्याच प्रयत्नांत शिंदेंनी महापालिकेत बाजी मारली आणि ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. 2004 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. इथे सुद्धा पहिल्याच प्रयत्नात ते निवडून आले.
 
2004 सालापासून सलग चार वेळा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेत.
 
शिंदे यांनी या आधी 2015 ते 2019 पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.
 
बंडखोरीचे दिवस
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते नगरविकास मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबरच्या सरकारमधून बाहेर पडून भाजपबरोबर सरकार स्थापन करावं अशी त्यांची मागणी सुरुवातीपासून होती.
 
सुरुवातीला 11 मग 29 आणि सरतेशेवटी 45 आमदार सोबत नेण्याची कामगिरी त्यांनी साधली. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि बंडखोर आमदारांना अनेकदा परत येण्याचं आवाहन केलं. मात्र ते बधले नाहीत. उत्तरोत्तर त्यांची भूमिका आणि वक्तव्य अधिकाधिक बंडखोरीची होत गेली. हे बंड इतकं टोकाला गेलं की उद्धव ठाकरे सरकारमध्ये फक्त आदित्य ठाकरे हा एकटाच लोकनिर्वाचित नेता उरला होता.
 
आता एकनाथ शिदेंच्या नेतृत्वाखाली ज्या वेगाने महाराष्ट्राचा विकास झाला तो वेग आता संपणार आहे. मला विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ओबीसींना पुन्हा आरक्षण देण्याचा विषय निश्चित टप्प्यावर घेतील
 
मी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो. असं देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस देणार बाहेरून पाठिंबा