मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारनं विधानसभेत बहुमत सिद्ध केलं आहे. भाजप, शिंदे गट, बविआ, प्रहार आणि अपक्षांचे एकूण 164 आमदारांचा पाठिंबा शिंदे सरकारला मिळाला.
महाविकास आघाडीला 99 मतं मिळाली.
सुधीर मुनगंटीवारांनी शिंदे सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव मांडला आणि भरत गोगावलेंनी अनुमोदन दिलं. शिरगणतीने बहुमताची चाचणी पार पाडली.
शिवसेनेतील आणखी एका आमदारानं बंडखोरी केलीय. हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल झालेत. संतोष बांगर यांनी शिंदे गटाला मत दिलं आहे.
बांगर यांच्या बंडखोरीमुळे शिंदे गटातील आमदारांची एकूण संख्या 40 वर पोहोचली आहे.
रविवारी (3 जुलै) विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत संतोष बांगर यांनी शिवसेनेचे उमेदवार आमदार राजन साळवी यांच्या बाजूनं मतदान केलं होतं.
विधानपरिषद निवडणुकीनंतर ज्यावेळी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केली, त्यावेळी या बंडखोर आमदारांवर संतोष बांगरांनी टीका केली होती. कळमनुरी या त्यांच्या मतदारसंघात जाऊन बंडखोर आमदारांचे प्रतिकात्मक पुतळेही जाळले होते.
शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहीन असं 10 दिवसांपूर्वी रडत रडत संतोष बांगर यांनी सांगितलं होतं.