Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यालयी न राहणाऱ्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई - श्री. संजीव कुमार

मुख्यालयी न राहणाऱ्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई - श्री. संजीव कुमार
, मंगळवार, 16 मे 2017 (15:41 IST)
राज्यात सध्या अवकाळी पाऊस व वादळांमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडतआहेत.  अशा काळात ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, त्यांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी सर्वअधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असून मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीवकुमार यांनी दिले आहेत. 
 
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष परिमंडलस्तरावर काम करणाऱ्या कनिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ,कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद करण्याचा उपक्रम महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी सुरू केला आहे.  श्री. संजीव कुमार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपल्याशी थेट संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.  या उपक्रमांतर्गत दि. 15 मे 2017 ला कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ग्राहक व कंपनीच्या हितासाठी कर्मचाऱ्यांनी केलेल्या सूचनांचे स्वागत केले. या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही श्री. संजीव कुमार यांनी यावेळी दिले.
 
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी. त्यामुळे ग्राहकांना मोबाईलद्वारे महावितरणच्या विविध सेवा उपलब्ध करून देता येईल. तसेच जनमित्र व तंत्रज्ञयांनी संबंधित गावातच राहावे, त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींची त्यांना तातडीने दखल घेता येईल व ग्राहकांशी सुसंवाद राहील. त्यातून वीजबिलाची वसुलीही चांगल्या प्रमाणात होईल, असे मत संजीव कुमार यांनी व्यक्त केलेे.
 
महावितरणची सध्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशावेळी सर्वच कर्मचाऱ्यांनी विशेषत: तरुण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या हिताचा विचार करून कमीत कमी निधीत विविध विकासाची व पायाभूत सुविधांची कामे करावीत असे आवाहन श्री. संजीव कुमार यांनी केले. तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत आपण सकारात्मक असून कर्मचाऱ्यांनी कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वसुलीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करावे, असेही निर्देश श्री. संजीव कुमार यांनी दिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संघर्षयात्रेच्या चौथ्या टप्प्याची १७ मे पासून सुरुवात