Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Environment Day : हवामान बदल आणि अरबी समुद्रात उष्णतेच्या लाटेनं मुंबईतले मच्छीमार संकटात

Environment Day : हवामान बदल आणि अरबी समुद्रात उष्णतेच्या लाटेनं मुंबईतले मच्छीमार संकटात
, शनिवार, 4 जून 2022 (20:10 IST)
मुंबईत मासेमारी करणारे दर्शन किणी सांगत होते, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती.
मे महिन्यातल्या एका सकाळी आम्ही मार्वे किनाऱ्यावर भेटलो, तेव्हा दर्शन नुकतेच बंदरात परतले होते. त्यांच्याशी बोलताना जाणवलं, की यंदा उन्हाळ्यात मुंबईजवळच्या समुद्रातले मासे जणू गायबच झाले.
 
हवामान बदलामुळे घडणाऱ्या घटनांचा इथल्या समुद्रावर परिणाम झालाय आणि दर्शन यांच्यासारख्या समुद्राशी नातं राखणाऱ्यांना तो पावलोपावली जाणवतो आहे.
 
"आज मी सकाळी साडेचारला उठलो, पाच साडेपाचपर्यंत चारकोपमधल्या माझ्या घरून निघालो नी इथे आलो. मित्रासोबत त्याच्या बोटीतून समुद्रात गेलो, तिथे आमच्या जाळ्या लावल्या आहेत. बरीच वाट पाहिली. पण पाच जाळ्यांमध्ये एकही मासा लागला नाही."
 
पाच-सहा तास मेहनत केल्यानंतर आलेला थकवा बाजूला सारत दर्शन मग आपली छोटी बोट घेऊन निघाले. निदान जेवणापुरता मासा मिळतोय का या आशेनं वडिलांसह खाडीत शिरले. पण दुसऱ्या खेपेसही त्यांना रिकाम्या हाती परतावं लागलं.
 
ते सांगतात, पूर्वी असं नव्हतं.
 
"तेव्हा कुठलंही जाळं टाकलं की टोपलंभर मासे यायचे. आज एकही मासा इथे मिळत नाही."
 
हवामान बदलाचा मासेमारीवर परिणाम
साडेतीन-चार वर्षांचे असल्यापासून दर्शन समुद्रात जातायत. आता ते 36 वर्षांचे आहेत. तीन दशकांत या खाडीत झालेला बदल त्यांनी जवळून पाहिला आहे.
 
"माझे आजोबा, वडील सांगायचे की या खाडीत माणसाएवढे शार्क, वाघळ, स्टिंग-रे, डॉल्फिन्स यायचे. मी स्वतः लाईन आणि हूकनं मासेमारी करायचो आणि किलो किलोचे मासेही सहज मिळायचे.
 
समुद्रकिनाऱ्यापासून अगदी दोन, पाच किलोमीटरवर जे मासे मिळायचे, त्याच्यासाठी आता तीस चाळीस किलोमीटरवर जावं लागतंय. पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या दर्शन यांच्यासारख्या मच्छिमारांना हे परवडत नाही.
 
डिझेलच्या वाढत्या किंमती, ट्रॉलरनं होणारी यांत्रिक मासेमारी आणि समुद्रतळ खरवडून काढणारी 'पर्स सीन' नेट्स तसंच प्रदूषण यांमुळे आधीच फटका बसला आहे. त्यात हवामान बदलामुळे परिस्थिती बिकट बनते आहे.
 
दर्शन सांगतात, "वादळ आलं की मासेमारी बंद करावी लागते. गरमीचाही माशांवर परिणाम होतोच. माशांचं अन्न असलेलं प्लवक मरून वरती तरंगतं. त्याचा फेस आपण समुद्रात बघू शकतो. मागे तापमान बदलल्यानं एवढे जेली फिश आले होते, की आमचं अख्खं जाळं त्यानंच भरून जायचं, मासे तेव्हा एकदमच बंद झाले होते."
 
फक्त मासेमारी करणाऱ्या लोकांवरच नाही, तर मासळी विकणाऱ्या महिलांनाही फटका बसलाय.
 
महिलांचं उत्पन्नाचं साधन संकटात
नयना भंडारी गेली अनेक वर्ष चारकोपच्या बाजारात मासेविक्री करतायत. सकाळी बाजार उघडताच आपलं दुकान लावून त्या ग्राहकांची वाट पाहात होत्या.
 
नयना सांगतात, "यावर्षी ना, भरपूर कमी झाली मच्छी. आणि महाग पण झालीय. आधी भरपूर मासे मिळायचे आणि स्वस्त असायचे. पहिले कसं, मी कमवायचे तर बाजूला रहायचं. आता काही बाजूला नाही राहात. आता आमच्या दोघांच्या जवळचे पैसे संपून जातात, महिन्याला बॅलन्स नाही राहात. "
 
नयना यांच्यासारख्या महिला मासळी व्यवसायाचा कणा आहेत.
 
सरकारी आकडेवारीनुसार साडेसातशे किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेल्या महाराष्ट्रात जवळपास सव्वातीन लाख लोक मत्स्य व्यवसायात आहेत. तर देशभरात 28 लाख लोक या व्यवसायात आहेत.
 
यात मासेमारीनंतरच्या उलाढालीत महिलांचं योगदान सुमारे 70 टक्के आहे आणि माशांची संख्या कमी झाल्याचा थेट परिणाम त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावरही होतोय.
 
पापलेटच्या किंमतींचा उच्चांक
आवक कमी झाल्यानं बाजारात मासळीच्या किंमतीही यंदा गगनाला भिडल्या. मालाडच्या होलसेल बाजारात पापलेट माशाची जी जोडी दीड एक वर्षापूर्वी अकराशे रुपयांना मिळायची, तिची किंमत अडीच हजारांवर गेलीय, असं तिथे खरेदी करायला आलेल्या मनीषा सांगतात.
 
त्या म्हणतात, "पहिले मासे आकारानंही मोठे असायचे आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मासे मिळायचे. आता तेवढे येत नाहीत, जे येतात ते असे महाग मिळतात.
 
"आम्ही आठवड्यातनं तीन-चार दिवस, कधी दोन्ही वेळा मासे खायचो. आता एकदा किंवा फारतर दोनदा परवडतं."
 
तापमानवाढीनं मासे कमी का होतात?
1951 ते 2015 या कालावधीत हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान विषुववृत्तीय प्रदेशात एक अंश सेल्सियसनं वाढलंय. 2020-21 या वर्षातत कधी नाही ती अरबी समुद्रातही दोन चक्रीवादळंही आली.
 
2021 साली पश्चिम हिंद महासागर म्हणजेच अरबी समुद्राच्या परिसरात उष्णतेच्या लाटांचं प्रमाण वाढलंय असं केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा अहवाल सांगतो.
 
समुद्रात कुठल्या भागात कुठले मासे येतात हे आधी कोळ्यांना ठाऊक असायचं. आता त्यांचे आडाखे चुकतायत, कारण पाणी तापलं की मासे नव्या जागी स्थलांतरीत होतायत.
 
सागरी जीववैज्ञानिक वर्धन पाटणकर सोप्या भाषेत समजावून सांगतात. "आपण जसं इमारतींत राहतो, आपल्याला आपली घरं लागतात. तसंच माशांना राहायला एक अधिवास लागतो. प्रवाळ तो अधिवास पुरवतात. तापमानातल्या बदलामुळे तो अधिवास नष्ट होतो."
 
तापमानवाढीचा माशांच्या प्रजननक्षमतेवरही परिणाम होतो. वर्धन सांगतात, "माशांच्या अनेक प्रजाती प्रजोत्पादनासाठी वेगवेगळ्या रासायनिक संकेतांवर अवलंबून असतात. विशिष्ट परिस्थितीत नर आणि मादी एकाच वेळी आपली युग्मकं बाहेर सोडतात आणि त्यातून पुढे नव्या जीवांची निर्मिती होते. (बाह्य निषेचन)
 
"पण तापमान वाढलं, की समुद्राची त्याची रासानिक घटना, संरचना बदलते. माशांच्या प्रजोत्पादनाच्या क्षमतेत बदल होतात. त्यातलं संतुलन बिघडतं आणि त्याचा थेट परिणाम माशांच्या संख्येवर होतो.
 
"एके काळी असा समज होता, की समुद्रात अगदी अमर्याद मासे आहेत. त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. पण तसं नाही, हे आता स्पष्ट होतंय.
 
मासेमारीची आकडेवारी दिशाभूल करणारी?
केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ फिशरीजचा अहवाल सांगतो की समुद्रातून पकडलेल्या मासळीचं प्रमाण गेल्य् दहा वर्षांत वाढत गेलं आहे. 2012 मध्ये 32 लाख टनांवरून ते 2020 साली 37 लाख टनांवर पोहोचलं आहे.
 
पण हे आकडे खरं चित्र दाखवत नाहीत, असं अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे देवेंद्र दामोदर तांडेल सांगतात. त्यांच्या मते "वर्षभराचे एकूण आकडे पाहण्याऐवजी एवढे मासे कुठल्या महिन्यांत मिळाले हे पाहावं लागेल. पारंपरिकरित्या तीन महिने मासेमारी बंद असायची, कारण तो माशांचा प्रजनन काळ असायचा. आता केवळ पाऊस म्हणून दोन महिनेच मासेमारी बंद असते आणि त्यातही काही बोटी बेकायदा समुद्रात जातात.
 
"पर्स सीन (बारीक भोकं असलेली झोळीच्या आकाराची मोठी जाळी) वापरून मासेमारी करणाऱ्या बोटींचा वादही आहेच. या मोठ्या बोटी समुद्रात दूरवर जाऊन सगळा तळ खरवडून काढतात आणि अगदी बारीक बारीक मासेही पकडतात. त्यामुळे उत्पादन वाढलेलं दिसू शकतं. पण प्रत्यक्षात लहान मासळीही त्यात पकडली जाते.
 
अनेकदा बंदी असलेल्या ठिकाणी आणि बंदी असलेल्या काळात अशा बोटी सर्रास मासेमारी करतात."
 
हीच परिस्थिती राहिली, तर दोन तीन वर्षात महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळचे मासे नष्टच होतील अशी भीती ते व्यक्त करतात.
 
पुढे काय?
देवेंद्र तांडेल खंत व्यक्त करतात, की समुद्रातल्या बदलांकडे लोक अजून गांभीर्यानं पाहात नाहीयेत. ते म्हणतात, "झाडं आपल्यासमोर असतात. पण समुद्राच्या आत काय चाललं आहे, हे दिसत नाही."
किनारी प्रदेशातल्या लोकांचं एक मुख्य अन्न आणि उत्पन्नाचं साधन संकटात आहे. याचा परिणाम मासे विकणाऱ्यांच्या पोटावर झालाय, तसाच तो मासे खाणाऱ्यांच्या ताटावरही झालाय.
 
सध्या दर्शनच्या कुटुंबियांनी उपजीविकेसाठी व्हॉट्सॲपच्या आधारे मासे विक्री सुरू केली आहे. पावसाळ्यानंतर मासेमारी पुन्हा सुरू होईल तेव्हा मासे परतलेले असतील एवढीच आशा त्यांना वाटते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

DCGI ने बायोलॉजिक्स ई च्या कॉर्बेव्हॅक्स लसीला बूस्टर डोस म्हणून मान्यता दिली