Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात पर्यावरणीय आरोग्य कक्ष स्थापन, श्वसनाशी संबंधित विकारांचे होणार सर्वेक्षण

rajesh tope
, शनिवार, 16 एप्रिल 2022 (07:49 IST)
राज्यात पर्यावरणीय आरोग्य कक्ष स्थापन करण्यात आला असून उष्णतेमुळे होणारे विकार तसेच राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमधील श्वसनाशी संबंधित विकारांचे सर्वेक्षण या कार्यक्रमांतर्गत करण्यात येत आहे.
 
तापमान वाढ, वातावरणातील बदल यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राष्ट्रीय वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय शासन समिती आणि कृती दलाच्या बैठकीमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या आरोग्य कक्षाबाबत माहिती दिली. राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी, आरोग्य संचालक डॉ. साधना ताडे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे डॉ. होसोळीकर उपस्थित होते.
 
वातावरणातील बदलांचा सामना करण्यासाठी पर्यावरण, हवामान विभाग, भूजल सर्वेक्षण, कृषी, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, आपत्ती व्यवस्थापन विभाग या सर्वानी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या वेळी स्पष्ट केले.
 
राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य संदर्भातील परिणामांबाबत सादरीकरण केले. प्रदूषित शहरांतील नागरिकांमधील श्वसनविकारांच्या सर्वेक्षणाबरोबरच सर्वसामान्य जनता लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करणार असल्याचे डॉ. आवटे यानी सांगितले.
 
राज्यातील सर्वाधिक प्रदूषण असलेल्या पुणे, मुंबई, जालना, चंद्रपूर अशा शहरांतील सरकारी रुग्णालयांत तीव्र श्वसनविकाराच्या रुग्णांची नोंद करण्यात येईल. प्रमुख १७ शहरांमध्ये असा कार्यक्रम राबवण्यात येणार असून तेथील शासकीय रुग्णालये यांमध्ये सहभागी असतील. डॉ. आवटे म्हणाले, उष्णतेमुळे होणाऱ्या विकारांचे सर्वेक्षण, उष्माघाताच्या लाटेवर त्वरित करण्याच्या उपायांबाबत नियोजन यांबाबत या बैठकीत चर्चा झाली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात सदावर्तेंवर गुन्हा दाखल