प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत्या १८ फेब्रुवारीला होत आहे. यावेळी विद्यार्थ्यांना प्रथमच उत्तरपत्रिकांची कार्बनकॉपी परीक्षा संपताच हातात दिली जाणार आहे. सेमी इंग्रजीच्या परीक्षार्थ्यांनादेखील एकच पेपर असणार आहे.
शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीनंतर ५ वी आणि ८ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते, त्यावेळी ५ वीसाठी ४ लाख ८८४७० आणि ८वीसाठी ३ लाख ६९ हजार ९९५ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. एकूण ६१७७ केंद्रांवर ही परीक्षा होणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली. विद्याथ्र्यांना बारकोड पद्धतीने त्याची माहिती करावी लागणार आहे. त्यासाठी पर्यवेक्षक त्यांना मदत करतील. राज्यातील १६१५३ विद्याथ्र्यांना स्कॉलरशीपसाठी पात्र ठरविण्यात येणार असून, परीक्षेत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले जाणार नाही. त्याला मिळणाऱ्या गुणांची गुणपत्रिका दिली जाणार आहे.
परीक्षेतील प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेचा बारकोड हा विद्याथ्र्याचा सीट नंबर असणार आहे. बहुसंची पद्धतीने प्रश्नपत्रिका देण्यात येईल. यावर्षी विद्याथ्र्यांना उत्तरपत्रिकेची डिजिटल कॉपी देण्यात येणार नाही. कार्बनलेस उत्तरपत्रिका असल्याने विद्यार्थ्यांना पेपर संपताच पर्यवेक्षक कार्बनप्रत विद्याथ्र्यांना देतील, असे डेरे यांनी सांगितले.
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ८वी स्तरासाठी प्रत्येक पेपरमध्ये कमाल २० टक्के प्रश्नांच्या बाबतीत ४ पर्याय दिले असतील, त्यातील दोन बरोबर पर्याय निवडून त्याच्या उत्तरात गोल करावयाचे आहेत. प्रश्नपत्रिकेत दोन अचूक पर्याय निवडा, अशी सूचना असणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरावर दोन वर्तुळे रंगवायची आहेत. हेच उत्तर ग्राह्य धरण्यात येणार आहे.