राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात येणार शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राध्यापकांसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (युजीसी–नेट) एकाच दिवशी होत असल्यामुळे उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे. अनेक विद्यार्थी हे नेटची तयारी करण्याबरोबरच टीईटी, सेट अन्य स्पर्धा परीक्षाही देत असतात. मात्र, आता या दोन परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे हजारो उमेदवारांना दोन्हीपैकी एक संधी गमवावी लागणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्राध्यापक होण्यासाठी किंवा कनिष्ठ संशोधक म्हणून काम करण्यासाठी नेटमध्ये पात्र होणे आवश्यक असते. यंदा या दोन्ही परीक्षा दि. 8 जुलै रोजी होणार आहेत. दरवर्षी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आणि शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदविका घेतलेले हजारो उमेदवार या दोन्ही परीक्षा देतात. मात्र, यंदा या परीक्षा एकाच दिवशी होत असल्यामुळे उमेदवारांना दोन्हीपैकी एका संधीवर पाणी सोडावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर टीईटीची तारीख बदलण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.