सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी, या मागणीसाठी विरोधक आज आक्रमक झाले. विधानभवनाच्या आवारात सरकारविरोधी फलक झळकावत विरोधी पक्षांतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार , आमदार विद्या चव्हाण, आ. विक्रम काळे , आ. राजेश टोपे व अन्य आमदार उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांत ८ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दिवसाला सरासरी १० पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरी या सरकारला शेतकऱ्यांची कीव येत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी खंत व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी विधिमंडळातील १५० पेक्षा जास्त सदस्यांची मागणी आहे. त्यामुळे या अधिवेशनात सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असे ते म्हणाले.
आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकाच्या पत्नीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, परिचारक यांचं वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आहे त्यामुळे त्यांना सभागृहातून कायस्वरुपी बडतर्फ करावे, अशी विरोधकांची मागणी आहे. दरम्यान सभागृहातही विरोधीपक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी लावून धरली त्याच मुद्द्यावरून विधानसभेचे कामकाज आधी दोन वेळा व नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले.
दरम्यान, प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाच्या मागणीचे पडसाद विधान परिषदेतही सातत्याने उमटत असून या सरकार याबाबतीत सरकार काय भूमिका घेणार हे कळेपर्यंत कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. विरोधक आक्रमक झाल्याने विधान परिषदेचे कामकाजही १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.