धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाला गालबोट लागले आहे. नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात गेल्यानंतर भाजप- शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्या हाणामारीमध्ये भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीचा जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. भावालादेखील जबर मारहाण झाल्याने जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे साक्री तणावाचे वातावरण आहे.
शिवसेना कार्यकर्त्याच्या बहिणीचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. या घटनेमुळे वातावरण तापलं आहे.
साक्री नगरपंचायतीमधील प्रभाग ११ मध्ये भाजपा उमेदवाराचा विजय झाला आणि निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची ३५ वर्षांची सत्ता हिसकावून घेतली आहे. यावेळी विजयी उमेदवार आणि शिवसेनेचे पराभूत उमेदवार यांच्या परिवारातील सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर राडा सुरु झाला तेव्हा शिवसेना कार्यकर्त्याच्या बहिणीने बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्यांनाही मार बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि मृत्यू झाला. मोहिनी नितीन जाधव असं या महिलेचं नाव आहे.
साक्री नगरपंचायतीत गेल्या ३५ वर्षांपासून सत्ता राखून असलेल्या नाना नागरे यांनाही निवडणुकीत अपयशाला सामोरे जावं लागलं आहे. केवळ चार जागा शिवसेनेला जिंकता आलेल्या आहेत. तर भाजपने मात्र ११ जागांवर विजय मिळवला आहे. साक्री नगरपंचायतीत भारतीय जनता पक्षाने ११, शिवसेनेने ४, काँग्रेस पक्षाने १ आणि अपक्षाने एक जागा जिंकली आहे.