भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाकडून किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर 15 दिवसांपूर्वी ACBकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर किशोर वाघ यांच्या चौकशीत कोट्यवधीची बेहिशेबी संपत्ती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. किशोर वाघ हे मुंबईतील परेल इथल्या गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते.
5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणात 4 लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आलं होतं. या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच 1 डिसेंबर 2006 ते दिनांक 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची ACB कडून खुली चौकशीही लावण्यात आली होती.
या चौकशीमध्ये कायदेशीर उत्पन्न, गुंतवणूक, ठेवी, खात्यावरील रकमेची संपूर्ण माहिती, वारसाहक्काची मालमत्ता, खर्च इत्यादी बाबींचा सविस्तर तपास करण्यात आला. या तपासात किशोर वाघ यांच्याकडे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचं आढळून आलं.